Sun, Apr 21, 2019 05:55होमपेज › Satara › बुद्धांनी जगाला दिली विपश्यनेची देणगी 

बुद्धांनी जगाला दिली विपश्यनेची देणगी 

Published On: Apr 30 2018 1:47AM | Last Updated: Apr 29 2018 7:57PMकराड : प्रतिनिधी 

भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी सुमारे  2500 वर्षांपूर्वी विपश्यना या ध्यान कलेला पुन्हा शोधून काढली आणि सार्वत्रिक रोगांसाठी सार्वत्रिक उपाय, अर्थात जीवन जगण्याची कला या रूपात सर्वांना सुलभ अशी बनविली. शरीरात होणार्‍या प्रत्येक हालचालीवर सूक्ष्मपणे आणि तटस्थपणे लक्ष ठेऊन सुखशांतीच्या मार्गाकडे जाणे म्हणजे विपश्यना अशी शिकवण बुद्धांनी जगाला दिली. आत्मनिरिक्षणाद्वारे आत्मशुध्दी करण्याचा मार्ग म्हणजे विपश्यना.

गौतम बुध्द यांनी जेव्हा महाला बाहेरील जगातील लोकांना अनुभवले त्यावेळी त्यांना वृध्द शरीर, आजारांनी पिडीत लोक, मृत व्यक्ति दृष्टीस पडल्या. याचा त्यांच्या मनावर  खोलवर परिणाम झाला. मनुष्य जीवनामध्ये यापेक्षाही वेगळे काय आहे? ज्याद्वारे मनुष्य या कष्टातून मुक्ती मिळवू शकतील? याचा अभ्यास त्यांनी केला. जीवनातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी तपश्‍चर्या केली. शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवश्यक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारा पासून वाचू शकतो व सद्वर्तनाकडे वळू शकतो यासाठी समाधी महत्वपूर्ण आहे. आपल्या मनाला वश करण्यासाठी भगवान बुध्दांनी  सार्वजनीक उपाय सांगितला.

येणार्‍या जाणार्‍या सहज स्वाभाविक श्‍वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्‍वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात. आपल्या नैसर्गिक श्‍वासावर लक्ष केंद्रीत करणे हा एक मनाचा व्यायाम आहे. विचार, विकार, भावना, संवेदना याची जाणीव आहे. गौतम बुद्धांच्या काळापासून आजपर्यंत आचार्यांच्या एका अखंडित साखळीद्वारे विपश्यना साधना चालत आली आहे. या साखळीतले विद्यमान आचार्य स. ना. गोयेन्का होय.  ध्यानाद्वारे कोणती संवेदना मिळू लागते. त्या नंतर ती सर्व शरीरात पसरते. यामुळे सत्याची जी जाणीव होते ती स्वतःच्या आत्मबलाची देणगी असते. हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात. हिंसा, खोटे बोलणे, वाईट विचार, चोरी, व्यसन यापासून दूर राहणे व विरक्तपणे स्वत:ला अनुभवणे म्हणजे विपश्यना होय. शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक ज्ञानासाठी विपश्यना हा एकमेव मार्ग आहे.  प्राचीन काळातील लोक मोक्ष प्राप्तीसाठी विपश्यना करत. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये विपश्यनेला फार मोठे महत्त्व आहेत. ताणतणाव राहण्यासाठी ध्यानाने मनाची स्थिरता ठेवण्यासाठी भगवान बुध्दांनी सांगितलेल्या उपायांची सध्या नितांत गरज आहे. 

बुद्धांचे अष्टांग मार्ग

तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वानाच्या समीप पोहोचण्यासाठी ‘अष्टांग’ मार्ग सांगितला आहे. 

सम्यक दृष्टी - निसर्ग नियमाविरूध्द कोणतीही गोष्ट होवू शकते ही गोष्ट न करणे 
सम्यक संकल्प - योग्य निर्धार व विचार 
सम्यक वाचा - करूणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे
सम्यक कर्मान्त - उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
सम्यक आजीविका - वाईट मार्गाने आपली उपजीवीका न करता ती सन्मार्गाने करणे. 
सम्यक व्यायाम - वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. 
सम्यक  स्मृती - तात्विक गोष्टींचे स्मरण करून चित्त (मन)  जागृत ठेवणे  
सम्यक समाधी - कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसंन्न आणि शांत ठेवणे.