Fri, May 24, 2019 20:39होमपेज › Satara › बुद्ध जयंती विशेष : शांतिदूत भगवान गौतम बुद्ध 

बुद्ध जयंती विशेष : शांतिदूत भगवान गौतम बुद्ध 

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 8:11PMबुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौध्द धर्मीयांचा प्रमुख सण आहे. हा सण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुध्दांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वान या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिध्दांतावरून तथागत बुद्ध विश्‍वातील सर्वात महान पुरूष होते, असे मानले जाते. बौद्ध धर्माला मानणारे प्रामुख्याने भारत, चीन, नेपाल, सिंगापूर, व्हियेतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान आदी देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातील बुद्ध पौर्णिमेसाठी सार्वजनिक सुट्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली.

कराड शहराच्या प्राचीनत्वाचे अवशेष शहरात आणि शहराच्या आसपास आजही अस्तित्वात आहेत. शिवाय या शहराच्या प्रचीनत्वाचे उल्लेख भारतातील दूरदूरच्या शिलालेखांत,महाभारतासारख्या महाकाव्यात आणि पुरातन ताम्रपटांत आहेत. यावरून किमान बावीसशें वर्षांच्याही अगोदरपासून कराड हे एक वैभवसंपन्न शहर असल्याची खात्री पटते. कराड शहराच्या इशान्येस एक मैलावर आगाशिवचा डोंगर आहे. त्याची उंची 1200 फूट आहे. आगाशिवच्या डोंगरात बुध्दकालीन लेणी आहेत. या लेण्यांची एकूण संख्या 54 असून त्यापैकी 22 लेणी कोयना नदीच्या बाजूस, 19 बहिरव दर्‍यांत आणि 23 जखीणवाडीकडील बाजूस आहेत. 

लेणी लयन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. लयन म्हणजे विश्रांतीस्थान अगर राहण्याची जागा. प्राचिनकाळी भारतात नालंदा, तक्षशिला आणि मगध ही प्रमुख विश्‍वविद्यालये होती. त्यापैकी मगध विश्‍वविद्यालयाची एक शाखा आगाशिवच्या लेण्यात होती. अशा या लेण्यांमध्ये राहुन बौद्ध भिक्षु धर्मतत्व अध्ययनाचे आणि प्रसाराचे काम करत असत. सन 1849 मध्ये सर बार्टल फ्रेअर यांनी या लेण्यांची नोंद करून तीन गटांत विभागणी केली आहे. जखिणवाडीकडील 23 लेणी, बहिरव दरीतील 19 आणि कोयना नदीच्या बाजूस तोंड करून असणारी 22 लेणी. या बौद्ध लेण्या खोदण्याच्या कालमानाची दोन टप्प्यांत विभागणी केली जाते. यातील हिनयानपंथी लेण्यांचा काळ इसवीसन पूर्व 2 रे शतक ते इसवी सनाच्या दुसर्‍या शतकापर्यंत असून त्या पहिल्या टप्प्यात मोडतात. तर इसवी सनाच्या 5 व्या शतकात महानपंथीय लेण्यांचा हा काळ दुसर्‍या टप्प्यात मोडतो.

अधिष्ठानावर अधांड, हर्मिका, छत्रदंड आणि छत्र अशी स्तुपाची रचना आहे. परंतु या लेण्यांतील छत्रदंड मात्र तुटक्या अवस्थेत दिसतो. हर्मिकेवर वेदिकेची नक्षी कोरली आहे. छताला विदाण असे म्हणतात. या लेण्यातील हे विताण गजपृष्ठाकृती असल्याचे दिसते. ते कमाणीच्या ठेवणीचे उथळ आहे. या सर्व लेण्यांतील वैशिष्ठ्य म्हणजे भिंतीवर व छताला लाकडी तुळ्या बसविल्या आहेत, असे वाटते कारण अशा प्रकारच्या खाचा प्रत्येक लेण्यांत आढळतात. अशी ही लेणी महाराष्ट्रात कुडे, जुन्नर, कान्हेरी, महाड, भाजे, पितळखोरे येथे आढळतात. 

आगाशिवच्या लेण्यांमध्ये बहुतकरून विहारच आढळतात. तसेच सहा चैत्युगृहेही आहेत. पावसाळ्यात निवांत ठिकाणी राहून अध्ययन करण्यासाठी या लेण्यांची निर्मिती बुध्दभिक्षूंसाठी करण्यात आली असावी. या ठिकाणी आकाराने लहान असणारे विहार, स्तंभ नसलेली चैत्यगृहे, सभामंडप, विहरातील मंचक, चौकोनी स्तंभविरहीत ओवर्‍या आढळतात. तर काही लेण्यात प्रवेशद्वाराजवळ उजेडासाठी चौकोनाकृती गवाक्षेही कोरलेली आहेत. बहुतांशी विहारांच्या समोर खोदलेल्या पाण्याच्या टाक्या असून त्यामध्ये सदासर्वकाळ पाणी असते. लेणे क्र. 48 च्या चैत्यगृहात ही एक वैशिष्टयपूर्ण शिल्प आढळते की जे येथील कोणत्याही लेण्यात आढळत नाही.

या शिल्पात एकून तीन व्यक्ती दिसतात. यातील डावीकडील पुरूषकृतीने डोक्यावर मोठ्या गाठीचा फेटा परिधान केला असून तो आकाराने सर्वात मोठा आहे. असे फेटे पितळ खोरे, अजिंठा, कार्ले, बेडसे या ठिकाणच्या लेण्यात आढळत असून सातवाहन कालिन भितीचित्रे व शिल्पातही आढळतात. शिल्पातील या व्यक्तीने कटीवस्त्र अशा प्रकारे नेसले आहे की, त्याच्या सोग्याच्या निर्‍या दोन्ही पायात घोळतात. परंतु त्याच्या हातातील इतर वस्तू अस्पष्ट दिसतात. त्याच्या बाजूस असणार्‍या स्त्री शिल्पाच्या हातात एक मंजुषा असून ती सदर पुरूषांस आलिंगन देण्याच्या पवित्र्यात असल्याचे स्पष्ट दिसते. या दोहोंच्या वरतीही एक शिल्प असून ते अस्पष्ट आहे.  

चचेगाव बाजूच्या डोंगरात बौध्दकालीन लेण्या आढळतात. येथे एक चैत्यगृह व तीन विहार आहेत. यातील काही आकाराने मोठे आहेत. पण ती अपूर्ण असल्याचा उल्लेख आहे. येथील हे चैत्यगृह वैशिष्टयपूर्ण असून प्रवेशद्वार इंद्रधनुष्या कृती आकाराचे आहे. या इंद्रधनुची दोन्ही टोके जमिनीला टेकत असून पावसाळ्यातील पाणी इतर ठिकाणी वाहून जाण्यास याची व्यवस्था केलेली आहे, अशी कलात्मक रचना इतर ठिकाणी आपणास क्वचितच दिसून येईल. हजारो वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक ठेवा आवर्जुन जपून ठेवावा असा आहे. 

आगाशिव डोंगरातील ही सर्व लेणी इसवी सन पूर्व 250 सन 2 र्‍या शतकातील असून ती थेरवादी अर्थात हिनयान पंतीयांची आहेत. भगवान गौतम बुद्धांना शाक्यसिंह म्हणून संबोधले जाते. बुद्धांचे प्रतिक म्हणजजे सिंह, धम्माचे प्रतीक म्हणजे धम्मचक्र, तथागतांचे महापरिनिर्वाण म्हणजे स्तूप ही प्रतिके या लेण्यांत आढळतात. याचे दर्शन आपल्याला या लेण्यांत होते. या लेणीतील 2/3 जागा व्यापणारा स्तूप असून स्तूपाभोवती प्रदक्षिणा पथही आहे.

संकलन -अशोक मोहने