Thu, Apr 25, 2019 13:35होमपेज › Satara › वसना नदीवर लोकसहभागातून उभारला पूल

वसना नदीवर लोकसहभागातून उभारला पूल

Published On: Sep 12 2018 1:50AM | Last Updated: Sep 11 2018 10:10PMपिंपोडे बुद्रुक : कमलाकर खराडे 

दहिगाव, ता. कोरेगाव येथील ग्रामस्थांनी अनेक वर्ष शासनाकडे मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने आपल्या सोयीसाठी लोकसहभागातून वसना नदीवर पूल बांधला आहे.सरकारच्या कोणत्याही निधीशिवाय एखाद्या नदीवर बांधला जाणारा हा बहुधा पहिलाच पूल असावा.

उत्तर कोरेगाव तालुक्यातून वसना  नदी वाहत आहे. साधारणपणे सहा ते आठ महिने नदीला कमी-जास्त प्रमाणात पाणी असते. नदीच्या पूर्वेला दहिगाव हे गाव आहे. गावची शेती ही गावाच्या पूर्वेला व नदीच्या पश्‍चिमेसही असल्यामुळे शेतकर्‍यांना नेहमीच नदीतून पलीकडे शेतीसाठी जावे लागत असते. प्रामुख्याने पावसाळ्यात नदीच्या पलीकडे जाणे जिकिरीचे होते.पाण्यातून मार्ग काढावा लागतो. त्याचा मोठा त्रास शेतकरी वर्गाला सहन करावा लागतो. विशेषतः महिला, जेष्ठ नागरिकांना नदीतून जाणे अवघड होते. परिणामी शेतीची कामे खोळंबतात व मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यातच गेल्या दहा वर्षापूर्वी गावाजवळच नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे होणार्‍या जलसाठ्यामुळे नदी पलीकडे जाणेच अवघड झाले होते. त्यासाठी गेली काही वर्षे नदीवर छोटा पूल बांधण्याची मागणी शेतकरी लोकप्रतिनिधी व शासनाकडे करत होते. मात्र त्यांच्या मागणीला केराची टोपलीच दाखवण्यात आली होती.

लोकप्रतिनिधी व सरकारच्या उदासीन धोरणामुळे आपली समस्या सुटू शकत नाही.या भावनेने गावाला एकीचे बळ मिळाले. गावकर्‍यांनी नदीवर स्वखर्चाने पूल बांधण्याचा संकल्प केला. कोणत्याही सरकारी अथवा लोकप्रतिनिधीच्या मदतीशिवाय हा संकल्प सिद्धीस नेला आहे. ग्रामस्थांनी बंधारावजा पूल साकारला आहे. याची एकूण उंची 20 फुट असून पुलाच्या पायापासून दहा फूट दगडी बांधकाम करून त्यावर 5  फूट  व्यासाच्या 10 पाईप बसवून त्यावर 5 फूट दगडी बांधकाम करण्यात आले आहे. हा पूल 16 फूट रुंदीचा व 215 फूट लांबीचा आहे. हे काम चालू असल्यापासून आजपर्यंत एकाही राजकीय नेत्याने इथे भेट दिलेली नाही, हे विशेष. हे काम ‘गाव करील ते राव काय करील काय’, या म्हणीप्रमाणे गावच्या एकजुटीतून पार पडले आहे. शेतकर्‍यांनी आपल्या सेवा सोसायटी, बचत गट, यातून कर्ज घेवून मदत केली आहे. काहींनी शेतीच्या उत्पनातून, नोकरी,  व्यवसाय, मित्रपरिवार, माहेरवासीन मुली, यांच्या माध्यमातून आर्थिक निधी उभा केला आहे.जवळपास 15 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. याच कामाची शासकीय खर्चाची किंमत 70   लाख रुपये एवढी झाली असती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सकारात्मक विचारांनी काम केल्यास काहीही होऊ शकते, याचा आदर्श दहिगावकर ग्रामस्थांनी घालून दिला आहेच. परंतु शासकीय उदासीनतेचा हा एक प्रकारे निषेधच म्हणावा लागेल.