Tue, Apr 23, 2019 05:44होमपेज › Satara › वधू-वर पित्यांचीही होतेय फसवणूक

वधू-वर पित्यांचीही होतेय फसवणूक

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 10:32PM

बुकमार्क करा

कण्हेर : बाळू मोरे 

सध्या लग्‍नसराईचा हंगाम सुरू झाला असून नवरी दाखवण्याच्या नादात वधू-वर सूचकांची मोठी धावपळ उडाली आहे. पारंपरिक संस्कृती लोप पावू लागल्याने बहुसंख्य लोक याकडे व्यवसायिकद‍ृष्ट्या पाहू लागले आहेत. लग्नासाठी मुलगी दाखवण्यासाठी पैसे उकळले जात आहेत. एवढेच काय लग्‍न ठरल्यानंतर वेगळं बरं का, असाही फंडा अवलंबला जात आहे. यामुळे अनेक वधू-वर पित्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. 

सरकारी, नोकरदार, उद्योगपती, जमीनदार वर शोधण्यासाठी वधू पक्ष तर सुंदर, सुसंस्कृत, खानदानी मुलगी शोधण्याच्या नादात  वर पक्ष प्रयत्नशील असतात. मात्र, मनाजोगते स्थळ मिळत नसल्याने आडला नारायण धरी.... पाय  समजून प्रत्येकजण इच्छुक वधू-वर सुचकांकडे धावू लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे. काहीवेळा वधू अथवा वराची माहिती नसतानाही जणू स्वत:ला सारीच माहिती असल्याचे भासवून असे सूचक दिवसातून किमान तीन मुली अथवा मुले दाखवून आपले मीटर पाडतात, पण लग्‍न ठरल्यानंतर वेगळं बरं का? असा टोलाही मारतात. लग्‍न ठरल्यास दोन्ही बाजूची परिस्थिती पाहून पाच ते दहा हजारांपासून पैसे उकळले जात आहेत. 

दिवसातून 3 मुली दाखवल्यास 500 रुपये मोबदला प्रत्येकाकडून ठरलेला असतो. त्यामुळे मुलांच्या अपेक्षा माहितअसतानाही त्यांना दोन मुली कशाबशा दाखवायच्या आणि शेवटी एक मनपसंद दाखवायची, पण शक्यतो तीही मुलाला नापसंत असावी आणि आपला मोबदला घेवून लगेच दुसरीकडे सुटायचे असा फंडा सूचक मंडळींकडून केला जात आहे.

अनेक वेळा वधूची व वराची पूर्ण कल्पना नसतानाही संग्याची टोपी मंग्याला घालावी, तशी एकमेकाबद्दल खोटी माहिती देऊन एखादे लग्‍न जुळवायचं आणि त्यांचं नशीब त्यांच्या सोबत म्हणून तेथून पोबारा करायचा, अशी परिस्थिती आज पैशाच्या अमिषाने वधू-वर सूचकांमुळे होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात निदर्शनास येत आहे. पूर्वी लग्‍न जमविणे, एकमेकांचा संसार उभा करणे मोठे पुण्याचे काम मानायचे. त्यामुळे प्रत्येक जण लग्‍न जुळवण्यात हिररीने पुढे असायचा, पण महत्वाचं असं की त्यात लोभ नसायचा पण माणुसकी असायची. मात्र, आता पारंपारिक संस्कृती लोप पावली जाऊन लग्ने जुळवली जात आहेत. त्यातून अनेकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी  आहेत.