Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Satara › विहे घाटात पुलाला तिसर्‍यांदा भगदाड

विहे घाटात पुलाला तिसर्‍यांदा भगदाड

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 30 2018 10:20PMमारूल हवेली : धनंजय जगताप

पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण या राज्यातील दोन महत्त्वपूर्ण विभागांना जोडणार्‍या घाटांपैकी एक असणारा विहे (ता. पाटण) घाटातील ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडले आहे. या पुलाचा डागडुजाचा प्रश्‍न अनेक महिन्यांपासून प्रलंबितच असून या घाट रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.

कराड - चिपळूण हा पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा विजापूर - गुहागर या प्रमुख महामार्गावरील 110 किलोमीटरचा महत्त्वाचा भाग आहे. या मार्गाचा वापर करून कोकणात लाखो पर्यटक चिपळूणमध्ये दाखल होतात. तसेच कोकणात जाणारी आणि कोकणातून पश्‍चिम महाराष्ट्रात येणारी अवजड वाहने यांचीही कायमच रेलचेल सुरू असते. कोकण हे व्यवसाय, उद्योग व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे असून या महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. 

याच महामार्गावर कराडपासून सुमारे 15 ते 18 किलोमीटर अंतरावर विहे घाट आहे. या घाटातील मोठ्या वळणावर ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाचा खालील भाग ढासळून भगदाड पडले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वीही दोनदा याच ठिकाणी पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यावेळी पडलेले भगदाड मुजवत ते दुरूस्त करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा तिसर्‍यांदा याच ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळेच या मार्गावरील दळणवळण धोक्यात आले आहे.  या मार्गावरील सध्यस्थितीतील वाहतूक पाहता वेळीच याकडे लक्ष देत बांधकाम विभागाने दुरूस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची होणारी वाहतूक आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता चालकांसह प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचे पहावयास मिळते. 

कराड - चिपळूण या मार्गाचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरणा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी रस्त्याकडेला दुतर्फा असलेल्या हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे.  या मार्गावर ओढे, ओघळ असलेल्या ठिकाणी मोर्‍या व पूल बांधण्याचे काम सध्यस्थितीत सुरू आहे. काही ठिकाणी असलेल्या अरुंद मोर्‍या, भराव खचलेल्या साईड पट्ट्या, मोठ्या पाईप टाकण्यासाठी रस्त्यात काढण्यात आलेल्या चरी व्यवस्थित न मुजवल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ताचे काम करत असताना ढिसाळ नियोजनामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दर्जेदार कामाची गरज, पण....

विहे घाटात ज्याठिकाणी भगदाड पडले आहे, त्याठिकाणी यापूर्वीही दोनदा दुरूस्ती करण्यात आली होती. सातत्याने पडणारा मुसळधार पाऊस आणि अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेता, रस्ता खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता कराड - चिपळूण मार्गाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी काम करताना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करण्याची आवश्यकता आहे.