Sun, Jul 21, 2019 01:56होमपेज › Satara › सातारा : धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले (video)

सातारा : धोम धरणात बुडालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले (video)

Published On: Jan 27 2018 8:00PM | Last Updated: Jan 28 2018 11:14AMवाई : प्रतिनिधी

पीएच.डी.चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचा धोम धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. सोमजित शहा (वय 26) व अविनाश दुनेड (27) अशी त्या दोघांची नावे आहे. विद्यार्थी बुडाले ही घटना समजताच  तहसीलदार अतुल म्हेत्रे व सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम घटनास्थळी पोहचले आणि बोटीमधून बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. अखेर रविवारी सकाळी धोम धरणातील दोन्ही मृतदेह सापडले.

 मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च या कॉलेजचे पीएच.डी. करणारे चार विद्यार्थी शनिवारी धोम धरणावर आले होते. त्यांच्या  प्रबंधासाठी धरणाचा अभ्यास करण्यासाठी ते आले होते. वाईपासून 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोंढवली गावच्या हद्दीत आल्यानंतर चौघांपैकी दोघांनी पोहण्यासाठी धरणात उड्या टाकल्या.

मात्र, या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गाळात अडकले. ही गोष्ट धरणाच्या काठावर बसलेल्या दोन मित्रांना समजल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केला. त्यानंतर ग्रामस्थांनी येऊन त्यांची शोधा शोध केली. तसेच तहसीलदार व पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली. अंधार पडल्याने मध्येच शोध मोहिम बंद करण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तहसीलदार अतुल म्हेञे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कदम, पोलीस हवालदार एस. एस. जाधव, एस. बी. कुडवे, बी. आर. शिंदे, एम. जी. सय्यद, वायदंडे आदींनी घटनास्थळी धाव घेवून शोध कार्य हाती घेतले  होते.  तसेच परिसरातील  50 ते 60 ग्रामस्थ शोधकार्यात शनिवारी  सायंकाळपासून कार्यरत होते.