Wed, Feb 26, 2020 22:05होमपेज › Satara › सातार्‍यात दोन्ही राजे आज अर्ज भरणार

सातार्‍यात दोन्ही राजे आज अर्ज भरणार

Published On: Oct 01 2019 2:03AM | Last Updated: Oct 01 2019 12:28AM
सातारा : प्रतिनिधी
श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन खासदारकीचा राजीनामा दिला. यामुळे विधानसभेबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभा व लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली असून उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले मंगळवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

विधानसभेच्या तोंडावर शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी व आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर लागोलाग लोकसभा निवडणूक जिंकलेले खा. उदयनराजेंनीही अवघ्या तीन महिन्यात राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सातारा तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणाचा रंग बदलला. 

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले व सातारा- जावली विधानसभा मतदारसंघासाठी शिवेंद्रराजे भोसले हे मंगळवार दि. 1 रोजी सकाळी सातार्‍यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.सकाळी 10 वाजता गांधी मैदान राजवाडा येथून या रॅलीला सुरूवात होणार असून ही रॅली मोती चौक, राजपथ, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, पोलिस मुख्यालय मार्गे पोवईनाका अशी काढण्यात येणार आहे.

 या रॅलीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,शिवसेनेचे उपनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील, माजी. आ. कांताताई नलावडे, ना. शेखर चरेगांवकर, अतुल भोसले यांच्यासह शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्र पक्षाचे विविध पदाधिकारी  व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. उदयनराजे हे जिल्हाधिकारी कार्यालय तर शिवेंद्रराजे हे सातारा प्रांत कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.