Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Satara › बोरीचा बार धडाक्यात; शिव्यांची लाखोली वाहण्याची परंपरा (Video)

बोरीचा बार धडाक्यात; शिव्यांची लाखोली वाहण्याची परंपरा (Video)

Published On: Aug 16 2018 1:44PM | Last Updated: Aug 16 2018 1:44PMलोणंद : प्रतिनिधी

ढगाळ वातावरण , मधुनच आलेली पाऊसाची हलकी सर , डफडे, शिंग, पिपाणीचा गजर, बांगड्याचा  किनकिनाट अन् जमलेली बघ्यांच्या गर्दीच्या साक्षीने बोरीचा बार ही परंपरा पार पडली.  खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावातील सुमारे तीनशे महिलांनी एकमेकींना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास बोरीचा बार घालून परंपरा सुरू ठेवली. बोरीच्या ओढयात या वर्षी पाणीच नसल्याने बोरीचा बार घालणाऱ्या महिलांबरोबरच बघ्याना आवरताना पोलिसांची दमछाक झाली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बोरीचा बार पाहण्यासाठी मोठी  गर्दी झाली होती.  रिमझिम पावसात हा बोरीचा बार पारंपारीक पध्तीने साजरा केला.

खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या गावातील महिला अनेक वर्षापासुन नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावाच्या दरम्यान जाणाऱ्या ओढ्यात येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरिचा बार धालण्याची परंपरा पुढे चालवित असतात. या वर्षे बोरीचा बार कसा होणार याची उत्सुकता सर्वानाच होती. त्यामुळेच मिळेल त्या वाहनाने पंचक्रोशी बरोबर इतर तालुका व जिल्ह्यातील हौशी बोरी गावात पोहचत होते. दुपारी 12.30 च्या सुमारास प्रथमता सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग आदी वाद्यासह वाजत गाजत ओढ्याच्या तीरावर येऊन हातवारे व टाळ्या वाजवत बार घालु लागल्या. त्यावेळीच बोरी गावातील काही उपस्थित महिलांनीही हातवारे करत बार घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच बोरी गावातील महिला वाजत गाजत येऊन बोरीचा बार घालू लागल्या.

दोन्ही बाजुच्या माहिलांनी एकमेकांना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली. ओढ्यामध्ये  पाणी नसल्याने बार घालणाऱ्या महिला बरोबरोबरच बघ्यांना आवरताना पोलीस, ग्रामस्थ यांची मोठी धांदल उडत होती.  बार घालणाऱ्या महिला हातवारे करत करीत शिव्यांची लाखोली वाहताना जसजसे डफडे, शिंग, तुतारीचा आवाज येत होता तसा महिलांचा उत्साह वाढुन टाळ्या वाजऊन एकमेकांना आव्हान देत होत्या. 

बोरीच्या बारात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपनिरिक्षक गणेश पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली  लोणंद, सातारा, शिरवळ , फलटण ग्रामीण, सातारा येथील सहकार्यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.