Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कोरेगावातील बोगस विद्यापीठाचा पर्दाफाश

कोरेगावातील बोगस विद्यापीठाचा पर्दाफाश

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोरेगाव: प्रतिनिधी

विद्यापीठ अनुदान आयोग आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या देशपातळीवरील शिखर संस्थांची कोणतीही मान्यता नसताना देखील आयनॉक्स इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीच्या नावाखाली कोरेगावातून इंटरनेटद्वारे बोगस युनिर्व्हसिटी चालवून, पैशांद्वारे पदव्यांचे वाटप करणार्‍या डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने याचा पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला आहे. त्याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मदने याच्या विरोधात राज्य शासन आणि शिखर संस्थांकडे तक्रारी अर्ज करण्यात आले आहेत. 

याबाबत समक्ष पोलीस ठाण्यातून मिळालेली हकीकत अशी, की कोरेगाव शहरातील सुभाषनगर या उपनगरामध्ये डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने हा अर्जुन चॅरिटेबल ट्रस्टद्वारे कामकाज करत असून, आयनॉक्स इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीच्या नावाखाली कोरेगावातून इंटरनेटद्वारे युनिर्व्हसिटी चालवत होता. तो स्वत: या तथाकथित बोगस विद्यापीठाचा कुलपती म्हणून देखील मिरवत होता. त्याचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल देखील झालेले आहेत. पुणे येथे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून समाजसेवा करणारे डॉ. अभिषेक हरिदास व विकास कुचेकर यांनी डॉ. मदने याच्या बोगसगिरीचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे तक्रारी अर्ज दिल्यानंतर यंत्रणा गतिमान झाली आणि अखेरीस बुधवारी रात्री कोरेगाव पोलीस ठाण्यात डॉ. मदने याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 

दि. 19 मार्च 2018 रोजी डॉ. हरिदास हे पुण्यात इंटरनेटवर बी. ए. एम. एस. या पदवीची शैक्षणिक माहिती घेत होते, त्यावेळी सर्चिंग करत असताना, त्यांना आयनॉक्स इंटरनॅशनल युनिर्व्हसिटीची बेवसाईट निदर्शनास आली. त्यांनी कुतुहलाने ही बेवसाईटची पूर्ण पालथी घातली आणि त्यावरील सर्व माहितीचे बारकाईने निरीक्षण केले. या बेवसाईटवर त्यांना मेडिकल, लॉ आणि इंजिनिअरिंगमधील पदव्यांसह पी. एचडी., डी. लिट आदी विविध पदव्या या युनिर्व्हसिटीच्या माध्यमातून मिळत असल्याचे लक्षात आले. याच बेवसाईटवर कुलपती म्हणून डॉ. विठ्ठल श्रीरंग मदने याचा उल्लेख असून, त्याचे नाव व मोबाईल क्रमांक दिलेला आहे. त्यावर डॉ. हरिदास यांनी कॉल केल्यावर डॉ. मदने याने तुम्हास हवी असलेली माहिती व्हॉट्सअप व ई-मेलद्वारे पाठवतो, असे सांगितले. लगेचच त्याने सर्व माहिती डॉ. हरिदास यांच्या व्हॉट्सअप क्षणाचाही विलंब न लावता पाठवली. डॉ. मदने याने पाठवलेल्या माहितीची शंका आल्याने डॉ. हरिदास यांनी खात्री करण्यासाठी डॉ. मदने याच्याशी संपर्क केला असता, त्याने बेवसाईटवर बँक खात्याची माहिती असून, त्यावर तुम्ही 50 हजार रुपये भरा आणि कार्यक्रमाला या, असे सांगितले. 

डॉ. विठ्ठल मदने याची युनिर्व्हसिटी बोगस व बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. हरिदास यांनी दि. 24 मार्च रोजी महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या बेवपोर्टलवर तक्रार दाखल केली. त्याचबरोबर शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे, पुणे येथील उच्च शिक्षण विभाग, नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीनंतर डॉ. मदने याने डॉ. हरिदास यांना धमकी दिली असून, त्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. डॉ. हरिदास यांच्या तक्रारीवरुन पुणे येथील उच्च शिक्षण संचालक यांच्या आदेशानुसार कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी चौकशी केल्यावर बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या. सरकारची मान्यता नसताना देखील नियमबाह्य पध्दतीने विद्यापीठ कार्यरत होते. त्यांनी त्याबाबत दि. 26 मार्च रोजी आपला अहवाल पुण्याच्या उच्च शिक्षण संचालकांना सादर केला आहे. या अहवालामध्ये डॉ. विठ्ठल मदने याने कुलपती पदनामासह स्वत:च्या स्वाक्षरीने सुमारे चारशे व्यक्‍तींना पीएचडी पदवी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालाची प्रत डॉ. हरिदास यांनी मिळवली आहे. 

याबाबत डॉ. हरिदास यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर यंत्रणा गतिमान झाली आणि त्यांच्या आदेशानुसार  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. डॉ. हरिदास यांनी डॉ. विठ्ठल मदने याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.

Tags : Satara, Satara News, Boogas, University, busted, Koregaon


  •