Sun, Jun 16, 2019 02:43होमपेज › Satara › कोरेगाव स्टेशनवर बोगस रेल्वे ‘टीसी’ला अटक 

कोरेगाव स्टेशनवर बोगस रेल्वे ‘टीसी’ला अटक 

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 11:03PMसातारा : प्रतिनिधी

रेल्वेचा तिकीट चेकर (टीसी) असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणार्‍या जावेद बशीर मिस्त्री (वय 37, रा. दौलतनगर, कराड) याला सातारा रेल्वे  पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्याला मिरज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी कराड येथे रेल्वे तिकीट चेकर असल्याचे सांगून संशयित प्रवाशांची फसवणूक करत होता. प्रवाशांना बिनधोकपणे तिकीटाची विचारणा करुन पैसेही घेत होता.

याबाबतची माहिती सातारा रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचाला. संशयित बोगस टीसी कोरेगाव येथे आला असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले. कोरेगाव रेल्वे स्टेशनवर तो प्रवाशांना तिकिटाची विचारणा करत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलेच. 

पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर जावेद मिस्त्री असे त्याचे नाव असल्याचे समोर आले.  पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे टीसीची बॅग व इतर साहित्य सापडले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुध्द दोन तक्रारदार मिरज येथे थांबल्याचे समोर आले. दरम्यान, प्राथमिक चौकशीमध्ये त्याने अशा पध्दतीने वारंवार फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

रेल्वे पोलिस निरीक्षक अजय संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एच.वाय. पवार, ए.आय. बागवान, पोलिस हवालदार विजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.