Mon, Apr 22, 2019 22:23होमपेज › Satara › ब्लॉग: विश्वव्यापी पंढरीची वारी, पसायदान येतंय सत्यात !

ब्लॉग: विश्वव्यापी पंढरीची वारी, पसायदान येतंय सत्यात !

Published On: Jul 07 2018 1:37PM | Last Updated: Jul 07 2018 1:37PMसतीश मोरे

भागवत धर्म सर्वांचा आहे. या धर्मांची पताका संत ज्ञानेश्वर महाराज यांनी उंचावली. तुकोबा माऊलीनी तर अल्लाह मध्येच पाडुरंग पाहिला. अवघ्या जगाची काळजी वाहणाऱ्या माऊलींनी जगासाठी पसायदान मागीतले. आता विश्वात्मक देवे, येणे वागज्ञे तोषावे,असे म्हणत जगातील सर्व लोकांना जे जे हवे आहे ते मिळावे असे मागणे मागीतले. सर्वांसाठी मागते ती माऊली. ज्ञानोबा तुकोबाराय माऊलींच्या या वैश्विक दृष्टीकोनावर फिदा झालेले जगभरातील भक्त वारीत सहभागी झाले आहेत. देव एकच आहे म्हणणारे ख्रिस्ती माऊलींचा गजर करत आहेतच शिवाय संतांच्या महाराष्ट्र भुमीतील मुस्लिम भाईजाननी तर स्वत:चे घर दार माऊलींच्या दिंडीला खुले केले आहे. वारीत सर्व धर्मभाव जपला जातो, वाढवला जातोय, वारीसाठी ईदचा सण सुद्धा एक दिवस पुढे ढकलला जातोय. माऊलींच्या पसायदानाचे दान विश्वभर उधळलं जातंय.

तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर जाऊ लागला आहे. माऊली सोहळ्याचे वेड अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षांपासून लागलेले आहेच.  गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखांवर पोहोचली. त्यानंतरच्या काळात 2 लाख पुढे 3,4,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. माऊलीच्या प्रेमाने, ज्ञानानं सर्वांना भुरळ घातली असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेले आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वारीत सहभागी होत आहेत. अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षा पुर्वी मांडली होती. ती आज सत्यात येताना दिसत आहे. 

गुंथर सोन्थायमर नावाचा जर्मनी येथील विद्वत्ताने अनेक वर्षे पुर्वी माऊली पालखी सोहळा आणि जेजुरीचा खंडोबा यावर एक डॉक्युमेंटरी तयार केली होती. या व्यक्तीला माऊली सोहळ्याची इतकी भुरळ पडली होती की त्यांनी हा व्हिडीओ जगभर प्रसिद्ध केला. युरिको इकेनोया ही जपान मधील एक व्यक्ती गेली 32 वर्षापासून वारीत सहभागी होत आहे. लिसा नावाची एक महिला भारतीय पारंपारिक साडी परिधान करून वारीत सहभागी होत आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या दिडीतून फ्रान्स मधील महिला वारी करत आहे. 

वारी आणि मुस्लिम समाज यांचे नाते अनेक वर्षापासून घट्ट आहे. गावागावात हिंदु मुस्लिम ऐक्य टिकून आहे याचे कारण दोन्ही समाजातील लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करतात. खरं तर हिंदू मुस्लीम एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगीतला जातो. 
 
जगदगुरु संत तुकोबाराय पुण्यातून दिंडी घेवून जात होते. मुख्य पुण्यातून जाताना एका भर चौकात जोराचा पाऊस सुरु झाला. दिंडीतले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जावून उभे राहीले .

परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजायला लागले. त्याच चौकात एक मस्जिद होती. मस्जिदित चर्चा सुरु झाली .

" आरे ओ तुकाराम भिग रहे है ओ बहुत ही बडे संत है " 

आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानांनी तुकोबारायांना आतमधे आदरपुर्वक धरुन नेले. नंतर सर्व दिंडी मस्जिदमध्ये गेली. सर्व वारकरी मस्जिदमधे जमले. रात्रीची किर्तनाची वेळ झाली. मुर्तीपुजा न माननार्याच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन करतील याची सर्वांना उत्कंठा लागली.

तुकोबाराय किर्तनाला उभे राहीले आणि अभंग घेतला.

अल्ला देवे अल्ला दिलावे !
अल्ला दवा अल्ला खिलावे !!
अल्ला बगर नही कोये !
अल्ला करे सो ही होये !! 1 !!

(अभंग क्र.444.गाथा देहुची प्रत ) 
  
ज्ञानेश्वर माऊलींनी यापुढे जाऊन अवघ्या विश्वाची काळजी वाहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटच्या 18 व्या अध्यायात माऊलींनी जगातील सर्व जाती धर्माच्या, वंशाच्या, वर्णाच्या पंथाच्या लोकांसाठी पसायदान मागीतले आहे. हे संत सर्वांची काळजी घेतात, उच्च नीच मानत नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजावर माऊलींच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात मुस्लिम समाज हिरीरीने सहभागी होतो. शेकडो वर्षांपासून मांडवी ओढा येथे वारकऱ्यांच्या दिंडीचा मुक्काम मुस्लिम कुटुंबात असतो. पिंपरद येथील  अनेक मुस्लिम कुटुंबे वारकरी मंडळाना अन्नदान करतात. वारीकाळात कोकण  येथील एका दिंडीचा दुपारचा भोजन विसावा मुस्लिम कुटुंबातच असतो. तोंडले बोंडले येथे माऊलींच्या रथासमोर असणारे मानाचे अश्व एका मुस्लिम कुटुंबातच पाणी पितात. ठाकूरबा वस्ती येथे रिंगण झाल्यानंतर तेथील मुस्लिम हॉटेल व्यवसायिक सर्वांना चहापान करतात. बरड येथे असलेल्या दर्गाहमध्ये वारकरी मुक्काम करतात. माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाल्हेकर मुस्लिम कुटुंबाकडे जेवण असते.
 
सातारा जिल्हातील कुशी या गावातून अकबरसा शेख यांच्या नेतृत्वात तुकाराम महाराज सोहळ्यात 2 तर माऊली आहे सोहळ्यात 3 दिंड्या प्रतिवर्षी जातात. गतवर्षी रमजान ईदचा पवित्र सण माऊली सोहळा लोणंद मुक्कामी होता त्याच दिवशी आला होता. यादिवशी सुमारे तीन लाख वारकरी लोणंद मुक्कामी  असतात. याचा विचार मुस्लिम समाजाने ईदचा सण एक दिवस पुढे ढकलला होता. माऊली सोहळ्यातील दिंडी क्रमांक 155 चा कारभारी मुस्लिम आहेत. दिवंगत जयतुंबी महाराज यांनी अनेक माऊली सोहळ्यात सहभागी होऊन वारी केली आहे. त्या किर्तन कार म्हणून प्रसिद्ध होत्या.