Mon, May 20, 2019 18:37होमपेज › Satara › निवार्‍यासाठी अंध दांपत्याची चिमुरड्यांसह परवड

निवार्‍यासाठी अंध दांपत्याची चिमुरड्यांसह परवड

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 10:50PMसातारा : विशाल गुजर 

भाड्याच्या घराला अचानक लागलेल्या आगीत संसार खाक झाल्यानंतर गेली पाच महिने अंध दांपत्याची दोन चिमुरड्यांसह निवार्‍यासाठी फरपट सुरु आहे. अद्याप हक्काचे छत मिळाले नसल्याने शाळेविना पोरं घरीच असल्याचा विदारक प्रकार सातार्‍यात समोर आला आहे. त्यामुळे पालिकेच्या घरकुल योजनेचे वाभाडे निघाले असून पालिका मिळकतींवर वर्षानुवर्षे बसलेल्या नागोबांना दूध पाजणारे पालिका अधिकारी गरजू लोकांना न्याय देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातार्‍यात ज्यांना घर नाही त्यांच्यासाठी जलमंदिरचे दरवाजे खुले असल्याचे विधान खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी सातार्‍यात केले असल्याने घरासाठी वणवण करणार्‍या अंध माधुरी महादेव जाधव यांनी सहकुटुंब राजेंची भेट घेतली. पालिकेच्या घरकुल योजनेतून घर मिळाल्यास दोन चिमुरड्यांना आसरा होणार असून निवार्‍याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने जाधव दांपत्याच्या आशा वाढल्या होत्या. कारण 3 फेब्रुवारी रोजी हे दांपत्य राहत असलेल्या मल्हार पेठेतील घराला अचानक आग लागल्याने अंध पत्नी आणि मुलांना वाचवताना महादेव हे 17 टक्के भाजले होते. त्यानंंतर राहत असलेल्या घराचे घरभाडे थकल्यामुळे ते घर सोडून मिळेल तिथे जाधव दांपत्याची गुजराण सुरु होती. 

गेल्या चार महिन्यांपासून निवार्‍याचा प्रश्न सुटला नसला तरी मुलांच्या शाळा सुरु झाल्याने जाधव कुटुंबाची होणारी परवड पहावणारी नाही. म्हणूनच एलबीएस कॉलेजच्या लगत तात्पुरता आसरा मिळाला असला तरी ज्या ठिकाणी आसरा मिळाला आहे. तेथेे या कुटुंबाचा होणारा कोंडमारा काळजाला भिडणारा असाच आहे.

माधुरी यांचा एक मुलगा सहनशील 7 वी तर मुलगी कनिष्का 4 थीच्या वर्गात शिकते. दोघेही हुशार असून हक्काच्या छतासाठी आई-बापांसह रोज वणवण भटकंती करीत आहेत. मिळेल ते काम करून गुजराण होत असली तरी सदरबझार येथील पालिकेच्या पडक्या खोल्यांमध्ये तरी या कुटुंबाला तात्पुरती जागा देण्याचे वचन खा. उदयनराजेंनी त्यांना दिले होते. यावर राजेंनी सूचना केल्या पण नगरपालिका अधिकारी मोकाट वागत आहेत.  शहरात कित्येक अनधिकृत बांधकामे वाढत असून  पालिका मिळकतींवर धनदांडग्यांनी केलेली अतिक्रमणे चालतात. मात्र, गोरगरीबांना असे वणवण फिरावे लागते, हे विदारक चित्र असून गरजू जाधव कुटुंबाला घर देत न्याय देण्याची भूमिका पालिका घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.