Fri, May 24, 2019 20:30होमपेज › Satara › धान्य काळ्याबाजाराबाबत अधिकार्‍यांची चुप्पी

धान्य काळ्याबाजाराबाबत अधिकार्‍यांची चुप्पी

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 10:52PM

बुकमार्क करा

कराड ः प्रतिनिधी 

गोरगरिबांच्या नावे येणारे रेशनचे धान्य काळ्या बाजारात चढ्या भावाने विकून काही रेशन दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असताना वरिष्ठ अधिकार्‍यांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. 

कराड तालुक्यात शहरासह 281 रेशन दुकान आहेत. या दुकानांमार्फत केशरी व पिवळ्या रेशन कार्डसह अंत्योदय योजना व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अत्यल्प दरात रेशनचे धान्य दिले होते. पण या धान्यालाच भ्रष्टाचाराची किड लागली आहे. रेशनचे धान्य कार्डधारकांना वेळेत दिले जात नाही, दिले तर ते अपुरे दिले जाते. याबाबत अनेक तक्रारी आहेत. धान्य आले कधी आणि संपले कधी हेही काहीवेळा कार्डधारकांना कळत नाही.  

या महिन्याचे धान्य दुसर्‍या महिन्यात देऊन एका महिन्याचे धान्य काळ्या बाजारात चढ्या भावाने विकायचे असे उद्योग काही रेशन दुकानदारांकडून सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकार वाढले आहेत. धान्य उचलण्यापासूनच यात काळाबाजार होत आहे. रेशन धान्य देताना प्राधान्य कोण कोणत्या दुकानदारांना द्यायचे, कोणत्या दुकानदारांना धान्य उशिरा द्यायचे, धान्य कोठा किती कमी द्यायचा हे ठरलेले असते. 

दारिद्रय रेषेखालील व अंत्योदय योजनेचा लाभ घेणार्‍या अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ रेशन धान्यांवर सुरू आहे. मात्र या गोरगरीब जनतेच्या मुखातील धान्य काढून घेण्याचे दुर्दैवी प्रकार काही रेशन दुकानदारांकडून सुरू आहेत. याला पुरवठा विभाग जबाबदार आहे. पुरवठा अधिकारी जर झोपेचे सोंग घेत असेल तर गोरगरीब जनतेने दाद मागायची कोणाकडे हा प्रश्‍न आहे. पुरवठा विभागावर सध्या कोणाचेही नियंत्रण नाही. आंधळ दळतंय.. असा तेथील बेजबाबदार कारभार सुरू आहे. पुरवठा अधिकारी गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नावर गंभीर नसतील तर त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी होत आहे. 

मध्यंतरी आगाशिवनगर येथील एका रेशन दुकानावर दफ्तरातील अनियमिततेबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानचा परवाना रद्दची कारवाई केली होती. मात्र संबंधित दुकान चालकाने या कारवाईवर स्टे आणला आहे. वरिष्ठ अधिकारी रेशन धान्य काळ्याबाजाराबाबत गप्प का याचे कोडे सुटत नाही.