Mon, Apr 22, 2019 23:59होमपेज › Satara › केळघर परिसरात रानगव्यांचा धुमाकूळ

केळघर परिसरात रानगव्यांचा धुमाकूळ

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 8:30PM

बुकमार्क करा
केळघर : वार्ताहर 

केळघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांनी धुमाकूळ घातला असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचा सुपडासाफ झाला आहे. शेतातील गहू,  स्ट्रॉबेरी, हरभरा, फरस बी, ज्वारीचा फडशा पाडला आहे. या प्रकारची वन विभागात माहिती दिली असता अधिकार्‍यांकडून पंचनामा करण्याची टाळाटाळ सुरू आहे. 

सधन असलेल्या केळघर परिसरात काही दिवसांपासून रानगव्यांनी उभ्या पिकात धुमाकूळ घातल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडांशी आलेले पिक या रानगव्यांमुळे होत्याचे नव्हते झाले आहे. याबाबत अनेकवेळा वन विभागाकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच दखल घेतली जात नाही. उलट नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांकडून विविध कागदपत्रांची  मागणी केली जात आहे. काही वर्षांतील मिळणार्‍या तुटपुंज्या भरपाईचा विचार करता भीक नको  पण कुत्रा आवर अशी शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. 

दरवर्षी काबाड कष्ट करून हातातोंडाशी आलेले पिक हे  गवे फस्त करणार असतील तर शेतकर्‍यांनी शेती करावी की नाही असा प्रश्‍न पडला आहे. यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेवून वनक्षेत्राला काटेरी कुंपण घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.