होमपेज › Satara › बिर्‍या कदम टोळीला ‘मोका’

बिर्‍या कदम टोळीला ‘मोका’

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:40PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

भोळी (ता. खंडाळा) येथे विटांचे ब्लॉक तयार करणारी  कंपनी दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी देत नसल्याच्या कारणातून त्या ठिकाणी जाऊन जाळपोळ करून दहशत माजवल्याप्रकरणी बिर्‍या ऊर्फ अमित रमेश कदम  (रा. लोणी) याच्या टोळीवर सातारा पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्यानंतरही पुन्हा हद्दीत प्रवेश करून विविध गुन्हे केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, भोळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील गट नं 171 मधील जागा या घटनेतील तक्रारदाराने भाड्याने घेतली आहे. त्या ठिकाणी स्नेह बिल्डकॉन या नावाचे विटांचे ब्लॉक तयार करणार्‍या कंपनीचे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे.  कंपनीचे काम सुरू असतानाच संशयित आरोपींनी सप्टेंबर 2017 ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत कन्स्ट्रक्शन साईटवर जाऊन पीसीसी वर्कचे काम किंवा दर महिन्याला 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी व काम देण्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने दि. 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास साईटवर जाऊन संशयितांनी बांधकामाच्या साहित्याची जाळपोळ करून जेसीबीच्या काचा फोडून नुकसान केले. या घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

गुन्ह्याच्या तपासामध्ये टोळीप्रमुख बिर्‍या व त्याच्या टोळीविरूध्द विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोनि बी. एन. पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे दिला. एसपी संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली आहे. पुढील तपास फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे करत आहेत.