Fri, Jun 05, 2020 13:03होमपेज › Satara › ऐतिहासीक भुषणगडाची होतेय पडझड

ऐतिहासीक भुषणगडाची होतेय पडझड

Published On: Feb 11 2019 1:28AM | Last Updated: Feb 10 2019 11:06PM
पुसेसावळी : विलास आपटे

इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या खटाव तालुक्यातील भूषणगडाला सध्या अनेक संकटांनी ग्रासले आहे.  दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे दगड ढासळत असून वेळीच दुरूस्तीची पावले न उचलल्यास हा अनमोल ठेवा नेस्तनाबूत होण्याची भीती निर्माण झाली आहे. गड-किल्ल्यांच्या मूळ ठेव्यांकडेच दुर्लक्ष झाल्याने गडप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाई देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे.  देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा याने हा किल्ला बांधला. इ.स. 1676 मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव इस्लामतारा ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स 1848 मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.

गडाच्या पायथ्याशी भूषणगड नावाचे गाव आहे. किल्ल्याच्या देखरेखीसाठी असलेले सरनोबतांचे वंशज आजही याठिकाणी आहेत. गडाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायर्‍या आहेत. गडाचे दृश्य विहंगम दिसते. दुरवरुन पाहिल्यास बैलाच्या वशिंडासारखा आकार या गडाचा आहे. गड चढून वर आल्यावर पूर्वेकडे तोंड करुन असलेले प्रवेशद्वार आहे. या ऐतिहासीक गडाचे बुरुज ढासळत आहेत. प्रवेशद्वारातील दगडी कमानीची पडझड झाली आहे.द्वारपालाच्या निवासासाठी बांधलेल्या ओवर्‍या सुस्थितीत आहेत. गडावर चिंचोळी व नागमोडी वळणाचा रस्ता आहे. गडाच्या तटबंदीचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. हा गड पर्यटक व गडप्रेमींसाठी धोकादायक बनला आहे. गडावर असणारी दगडी विहीरीत कचरा मोठ्या प्रमाणात पडल्याने या विहीरीला अवकळा आली आहे. अस्वच्छतेमुळे विहीरीतील पाणी प्रदुषीत झाले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून येथे येणार्‍या पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पुरातन गड व हरणाई देवीच्या दर्शनास भाविक व पर्यटक येतात. गडावर येणार्‍या पर्यटकांना सोयीसुविधांचा अद्याप अभाव आहे. गडावर बालगोपाळांसाठी बालोद्यान व्हावे. धोकादायक बुरूज व तटबंदीची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच ऐतिहासिक वास्तुंचे जतन व्हावे या उद्देशाने भुषणगडाचा विकास व्हावा, अशी मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे.