Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Satara › भुईंज ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त कधी?

भुईंज ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त कधी?

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 8:50PMभुईंज : जयवंत पिसाळ

राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा ते सातारा या दरम्यान, अपघातांची संख्या विचारात घेऊन माजी आमदार मदनदादा भोसले यांनी भुईंज येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर करून घेतले होते. मात्र, आजही केवळ राजकीय श्रेयवादापोटी व जिल्हा प्रशासनाच्या गांधारी भूमिकेमुळे लाल फितीत अडकले आहे. याबाबत वारंवार अपघातात जखमी झालेल्या व उपचारांअभावी मृत झालेले कुटुंबीयांच्या भावना व जनसामान्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. त्यामुळे भुईंजच्या मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयास मुहुर्त मिळणार का? असा प्रश्‍न भुईंज पडला आहे. 

खंडाळ्यापासून सातारा शहरापर्यंत  यामध्ये  विशेषतः   खंबाटकी घाटापासून वेळे, सुरूर, जोशी विहीर, भुईंज-बदेवाडी, पाचवड, उडतरे, आनेवाडी ही अपघातग्रस्त ठिकाणी ही नेहमीच घात-पात व लहानमोठे अपघात यासाठी प्रसिध्द आहेत. एखाद्या अपघातात जखमी झालेला व्यक्‍ती सातारा शहरात पोहोचेपर्यंत वाटेतच उपचाराअभावी गतप्राण होत असतो. ही बाब लक्षात घेऊन दहा वर्षापूर्वी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून व अपघातातील जखमी व मृतांची संख्या लक्षात घेऊन महामार्गावर भुईंज या ठिकाणी अद्ययावत ग्रामीण रुग्णालय असावे, असे सूचित केल्यानंतर तत्कालीन आमदार मदनदादा भोसले यांनी पाठपुरावा करून ते मंत्रालयातून मंजूर करून आणले होते. परंतु जिल्हा प्रशासनाचा डोळेझाकपणा व राजकीय श्रेयवाद यामुळे आजही हे रुग्णालय फक्‍त कागदावरच राहिलेले आहे. याबाबत भुईंज ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे ठराव वेळोवेळी पाठवून तसेच अनेक संघटनांकडून आवाज उठवूनसुध्दा दुर्लक्ष केले जात आहे. 

भुईंजच्या ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याशेजारी महामार्गालगतची पाच ते सहा एकर जमिन आरोग्य विभागाला दिली आहे. आज त्याठिकाणी फक्‍त प्राथमिक आरोग्य केंद्र हे किरकोळ प्राथमिक उपचारांसाठी सुरू आहे. भलामोठा परिसर, अत्याधुनिक इमारती असूनही या आरोग्य केंद्रात एखाद्या जखमीला व अत्यवस्थ असलेल्या रुग्णाचे प्राण वाचवू शकत नाहीत. यासाठी आरोग्य केंद्राच्या जागेवर ग्रामीण रुग्णालय सुरू करा अशी मागणी सातत्याने होत आहे. 

या रुग्णालयाबरोबर मंजूर झालेली जिल्ह्यातील सर्व रुग्णालये दहा वर्षापूर्वीच कार्यान्वित झालेली आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य जिल्ह्याचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहेत.