होमपेज › Satara › वेण्णा लेकच्या गळतीमुळे टंचाईचे सावट

वेण्णा लेकच्या गळतीमुळे टंचाईचे सावट

Published On: Apr 10 2018 1:13AM | Last Updated: Apr 09 2018 11:20PMभिलार : वार्ताहर

महाबळेश्‍वर-पाचगणी या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणार्‍या वेण्णा लेक धरणातून लाखो लिटर पाण्याच्या होणार्‍या गळतीमुळे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या गळतीबाबत उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाचगणी शहराला महाबळेश्‍वर येथील वेण्णा लेकमधून पाणी पुरवठा होत असतो. हा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.

सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या तज्ञ संशोधक पथकाने वेण्णा लेकला भेट दिली होती. यावेळी त्यांनी गळतीची पाहणी करून अहवाल सादर केला. यात धरणाच्या पायामध्ये सुमारे 125 फूट खोलीवर ही गळती असल्याचे सांगण्यात आले. धरणाच्या बांधकामात काही त्रुटी राहिल्याने ही गळती होत आहे.केमिकल ग्राऊंडींग टेक्नॉलॉजीने या धरणाची गळती काढावी लागेल, असे त्यांनी सांगितले. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे काम सुरू करावे व याकरिता 3 ते 4 महिने लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. यानुसार हे काम यापूर्वी सुरू होणे अपेक्षित होते पण, अजूनही हे काम सुरू नाही त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे .

सहा महिन्यांपूर्वी वेण्णा लेकमधून होत असलेली गळती  काढण्यासाठी अभियंत्यांनी गळती रोखण्यासाठी कॉटनचे कापड, गाद्या टाकून गळती थांबविण्याचा प्रयत्न करून तात्पुरती गळती थांबविली होती. पण, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुळे पाणीगळती होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा लक्षात घेता गळतीमुळे दोन्ही शहरांना आगामीकाळात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.  याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे
 

 

 

tags : Bhilar,news,Venna, lake, dam, has, millions,liters,water, leakage, Water, scarcity, crisis,