Tue, Apr 23, 2019 18:13होमपेज › Satara › अ‍ॅट्रॉसिटीबाबत भिडेंचे वक्‍तव्य चुकीचे

अ‍ॅट्रॉसिटीबाबत भिडेंचे वक्‍तव्य चुकीचे

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 10:35PM

बुकमार्क करा
तारळे : वार्ताहर

भिडे गुरुजींनी अ‍ॅट्रॉसिटीबाबत चुकीचे वक्‍तव्य केले आहे. या वक्‍तव्यामुळे अन्यायग्रस्तांची क्रूर चेष्टा झाली आहे. त्यामुळेच त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रमिक मुक्‍ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे. त्याचबरोबर 21 जानेवारीला गणमाता अंबाबाई मुक्‍ती आंदोलनाची रूपरेखा ठरवण्यासाठी कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक घेणार असल्याची घोषणाही डॉ. पाटणकर यांनी केली आहे.

सावरघर (ता. पाटण) येथील श्रमिक मुक्‍ती दलाचे 21 व्या अधिवेशनावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष वाहरू सोनावने, संपत देसाई, डॉ. प्रशांत पन्हाळकर, सुभेदार मेजर बन यावेळी उपस्थित होते.             

डॉ. पाटणकर म्हणाले, देवाने, संतांनी कधीही जातीपातीला थारा दिला नाही. मात्र, सद्यःस्थितीत त्याउलट कारभार सुरू असून, देवाला वंदन करतानाही जातीभेद केला जातो, असा दावा करत यापूर्वीच्या सरकारसह आत्ताच्या सरकारसोबत यासाठी लढा सुरू आहे. मात्र, पत्रव्यवहाराची भाषा सरकारला समजत नाही. त्यामुळे आता आंदोलन करून विशिष्ट  लोकांमधून देवाला मुक्त केले जाणार आहे. त्यासाठीच कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक घेऊन गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

भिमा कोरेगाव घटनेच्या पार्श्‍वभूमीवर वढू बुद्रूक येथे बाहेरच्या लोकांना गावाबाहेरच थांबवून गाव एकत्र आले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर हा पॅटर्न राबवण्याची गरज आहे. तेथील दोन्ही समाधी परिवर्तन केंद्र म्हणून उदयास याव्यात. 

मराठा व बहुजन समाजाचा संयुक्त महामेळावा घेणार सर्व जातींसह मराठा व बहुजन समाज यांचा संयुक्त महामेळावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत संभाजी भिडे यांनी चुकीचे व घटनाविरोधी वक्तव्य करण्याबरोबर शेतकरी चळवळ व शेतकर्‍यांचा अवमान केला आहे. त्यामुळे तातडीने त्यांनी माफी मागावी, अशी मागणी  केली. समाजाच्या मुलभूत रचनेत परिवर्तन करून जातीय आणि स्त्री म्हणून होणार्‍या शोषनांचा अंत करुन समृद्ध समाज घडविण्याचे मुख्य ध्येय आपल्या संघटनेचे आहे. अशा प्रकारचे संघर्ष करणारी देशातील एकमेव संघटना असल्याचे सांगत संघटनेचे कार्य 11 जिल्ह्यात सुरु आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनापर्यंत राज्यभर संघटनेचा विस्तार करू, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

खा. उदयनराजे यांनी चुकीचे विधान करू नये...

श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी भिडे गुरुजींचे समर्थन केले आहे. आपल्यास सर्व जनतेने निवडून दिले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवत चुकीची विधाने करू नयेत, असे आवाहनही डॉ. पाटणकर यांनी यावेळी केले.