Sat, Apr 20, 2019 10:44होमपेज › Satara › भगवा झेंडा घेऊनच राजकारण करावे : भिडे गुरुजी

भगवा झेंडा घेऊनच राजकारण करावे : भिडे गुरुजी

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 11:15PMवाई : प्रतिनिधी

महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात हिंदू स्वराज्य निर्माण व्हावे, यासाठी सर्व हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र यावे. प्रत्येक गावात युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांची आठवण म्हणून बलिदान मास करण्यासाठी जनजागृती करावी. रायगड हे महाराष्ट्राचे हृदयस्थान असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राजकारण्यांनी भगवा झेंडा घेऊनच राजकारण करावे, असे परखड मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक  संभाजीराव भिडे गुरुजी यांनी व्यक्‍त केले.

जांभळी (ता. वाई) येथे प्रतापगड ते रायरेश्‍वर या गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. भिडे गुरुजी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन निर्मितीसाठी केंद्र व राज्यातील मंत्री, नेते मदत करण्यासाठी इच्छुक आहेत; मात्र बरबटलेल्या हातांकडून कोणतीही मदत स्वीकारणार नाही. या सर्वांनी भगवे राज्य केल्यास मदत आम्ही स्वीकारू. महाराजांचे सिंहासन हे खर्‍या अर्थाने     स्वराज्याचे सिंहासन असणार आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदूत्व असून यासाठी हिंदूंमध्ये चैतन्य निर्माण झाले पाहिजे. सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक धारकर्‍याची असून कंबरेला कट्यार लावून राज्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन हजार धारकर्‍यांनी खडा पहारा द्यावा. हत्यार बाळगण्याची परवानगी आम्हाला छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांनी दिली आहे. त्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नाही. 

मुकूंदराव दातार म्हणाले, देश अडचणीत असताना प्रत्येकवेळी मराठाच मदत करतो, हा इतिहास आहे. धारकर्‍यांनी चांगली प्रेरणा घेवून आपल्या आयुष्यात बदल घडवावेत. वाद न  घालता समोरच्याशी सामंजस्याने वागावे. 

यावेळी आ. सुधीर गाडगीळ, राहूल सोलापूरकर, नितीन चौगुले, रावसाहेब देसाई यांनी मनोगत व्यक्‍त केले. या मोहिमेत बेळगाव, कर्नाटक, पुणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील धारकरी सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी दोन पोलिस उपअधिक्षक, दोन पालिस निरीक्षक, 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 350 पोलीस कर्मचारी, 80 होमगार्डच्या सहाय्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.