Mon, Jun 17, 2019 02:34होमपेज › Satara › डॉ. सौ. भारती पोळ यांचा  जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा

डॉ. सौ. भारती पोळ यांचा  जि.प. सदस्यत्वाचा राजीनामा

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 11:15PMसातारा : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी गोंदवले (ता. माण) येथील जिल्हा परिषद सदस्या व राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्नुषा डॉ.सौ. भारती संदीप पोळ यांनी जि. प. सदस्यत्वाचा राजीमाना दिला आहे. मराठा व धनगर समाजासाठी त्या आक्रमक झाल्या असून, मराठा समाजाने आणखी किती अन्याय सहन करायचा? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणासाठी आता मागे हटणार नसल्याचा इरादाही त्यांनी व्यक्‍त केला. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या लढाईतील ही महत्त्वपूर्ण घडामोड समजली जात असून आता जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. सातार्‍यात बुधवारी झालेल्या मराठा समाजाच्या मोर्चा व ठिय्या आंदोलनातून समाजातील शासनाबद्दलचा उद्रेक बाहेर पडला आहे. आता डॉ. सौ. भारती पोळ यांनीही आपल्या जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे गुरुवारी दुपारी सादर केला. त्यानंतर बोलताना सौ. भारती पोळ यांनी मराठा व धनगर आरक्षण तातडीने द्यावे यासाठी आपण आता ठोस भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, भाजप सरकारने मराठ्यांची तसेच धनगर समाजाचीही शुद्ध फसवणूक केली आहे. मराठा समाजाला मोठे स्थान असल्याचे सांगताना या समाजावर एक प्रकारे अन्याय केला जात आहे. आणखी किती वर्षे मराठ्यांनी हा अन्याय सहन करायचा? मोठेपणाच्या नावाखाली आमच्या भावी पिढ्यांवर अन्याय होत आहे. मी स्वत: मराठा आरक्षणासाठी पहिल्यापासून आग्रही आहे. सातार्‍यातील महामोर्चा असो अन्यथा माण तालुक्यातील समाजाची आंदोलने असोत, प्रत्येक ठिकाणी मी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. मराठा व धनगर समाजासाठी जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षे होत आली तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचेही सौ. भारती पोळ म्हणाल्या. 

त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मराठा, धनगर व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यशासनाने निवडणुकीत आश्‍वासन दिले होते. मात्र ते पाळलेले नाही. त्यांचा आरक्षण देण्याबाबतचा हेतू  संशयास्पद आहे. सध्या मराठा व धनगर समाज रस्त्यावर उतरला असून आरक्षणाबाबत काही कार्यवाही होत नसल्याने मी आरक्षणाच्या मुद्याला पाठींबा देण्यासाठी व पुढील पिढीसाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आरक्षणाची गरज व्यक्‍त करण्यासाठी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.