Mon, Apr 22, 2019 12:39होमपेज › Satara › डॉ. बाबासाहेबांसाठी अवतरले ‘निळे वादळ’

डॉ. बाबासाहेबांसाठी अवतरले ‘निळे वादळ’

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 11:01PMसातारा : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127  व्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी सातार्‍यासह अवघ्या जिल्ह्यात अक्षरश: निळे वादळच अवतरले. चौका-चौकात वाजत असलेले भीम गीतांचे पोवाडे, विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅली, मिरवणुका आणि विविध सामाजिक व विधायक उपक्रम अशा भारावलेल्या वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.  सातार्‍यातील शाहू चौकात असणार्‍या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता. सातार्‍यात सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीतील चित्ररथ लक्षवेधक ठरले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीसाठी अवघा जिल्हा भीममय झाला होता. विविध सामाजिक व दलित संघटना, संस्था, राजकीय संघटना यांनी जोरदार तयारी केली होती. कित्येक दिवस अगोदरपासून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे जयंतीच्या आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारीच सर्वत्र ‘भीममय’ वातावरण निर्माण झाले होते.  शुक्रवारी मध्यरात्री सातार्‍यात शाहू चौकात असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध दलित संघटनांनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर  सकाळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कैलास शिंदे तसेच रिपाइं व दलित संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

चौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमगीते लावण्यात आली होती. शहरामध्ये सर्व प्रमुख ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छांचे फलक झळकत होते. सातारा शहरासोबत उपनगर व ग्रामीण भागासह जिल्हाभर उत्साहाचे वातावरण होते. महात्मा फुले -डॉ. आंबेडकर  संयुक्त जयंती समारोह समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट, लहुजी शक्‍ती सेना, धम्म परिषद समिती, दलित महासंघ,  बहुजन सेना, दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आंबेडकर स्मारक समिती, संत रोहिदास सामाजिक संस्था,  लोकजनशक्ती पार्टी, भिमशक्ती व विविध संस्था, संघटनांच्यावतीने शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य मिरवणुकीस सायंकाळी 6.30 वाजता प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मिरवणुकीत विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ते, महिला व नागरिक सहभागी झाले होते. चित्ररथातील विविध देखाव्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती विषद करण्यात आली.  

Tags : Satara, Bharat Ratna, Dr  Babasaheb Ambedkar, 127th, Jayanti