Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › भैय्यू महाराजांच्या सातार्‍यातील आठवणींना उजाळा

भैय्यू महाराजांच्या सातार्‍यातील आठवणींना उजाळा

Published On: Jun 13 2018 9:14AM | Last Updated: Jun 13 2018 12:20AMसातारा : प्रतिनिधी 

श्री सद‍्गुरुदत्त धार्मिक एवंम पारमार्थिक ट्रस्ट, इंदौरचे युवा राष्ट्रसंत परमपूज्य सद‍्गुरु श्री भैय्यू महाराज यांच्या सातार्‍यातील आठवणींना उजाळा दिला जात आहे. सातार्‍यातील त्यांच्या भक्‍तगणांना शोक अनावर झाला आहे. दरम्यान, सुमारे सहा वर्षापूर्वी भैय्यू महाराज यांनी सातार्‍यातील दै.‘पुढारी’ कार्यालयाला आवर्जुन भेट दिली होती. या आठवणीही यानिमित्ताने जाग्या झाल्या आहेत. दरम्यान, भैय्यू महाराजांचा सातारा जिल्ह्यातील भक्‍त आणि समर्थक परिवार मोठ्या प्रमाणात असून हा परिवार शोकसागरात बुडाला आहे. 

प. प. सद‍्गुरु श्री भैय्यू महाराज नोव्हेंबर 2012 मध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने सातार्‍यात आले होते. यावेळी त्यांनी ‘पुढारी’च्या सातारा कार्यालयास आवर्जून  सदिच्छा भेट दिली होती. ‘पुढारी’ कार्यालयात आल्या आल्या भैय्यू महाराजांनी ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले होते. ‘फार मोठा माणूस’ असे म्हणत भैय्यू महाराजांनी स्वत:च ‘पुढारी’ कार्यालयात फेरफटका मारला होता. टीम ‘पुढारी’शी संवाद साधत भैय्यू महाराजांनी ‘पुढारी’च्या सातारा जिल्ह्यातील वाटचालीची बारकाईने माहिती घेवून कौतुक केले होते. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात जाधव यांचे योगदान फार मोठे असल्याचे गौरवोद‍्गारही भैय्यू महाराजांनी काढले होते. 

प्रत्येक क्षेत्राला एकत्र आणून बांधण्याची शक्ती आणि कोणत्याही आव्हानांना संपुष्टात आणण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे. जीवनाला  स्थिरता देणारा विचार आणि खरे आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारितेतून व्हावे. ‘पुढारी’त आल्यानंतर समाज उभारणीचे हे काम होत असल्याचे लक्षात येते. बहुजन समाजाचा उद्धार करणार्‍या या वृत्तपत्रातील  आक्रमक टीम पाहिल्यानंतर सातारा जिल्ह्याविषयीचा आपला अभिमान आणखी वाढला असल्याचेही भैय्यू महाराजांनी त्यावेळी आवर्जुन नमूद केले होते. त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे या आठवणी आता ताज्या झाल्या आहेत. 

भैय्यू महाराजांची एक्झिट चटका लावणारी

माणसांना जोडणारा आणि जगाला शांती,संयमाचे मार्गदर्शन करणार्‍या राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांचा असा अंत होणे अनपेक्षित आहे. अनेकांचा अध्यात्मिक पाया पक्‍का करण्याचे कार्य करणारे कै.भैय्युजी महाराज आमचे चांगले मित्र होते. मित्रत्वाचे नाते त्यांनी नेहमीच जपले. अध्यात्माबरोबरच सामाजिक उपक्रम राबवत समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांनी कायमच जोपासली. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे असले तरी एक प्रकारचे गुढ निर्माण करणारे आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

- खा. श्री. छ. उदयनराजे भोसले