Tue, May 26, 2020 18:09होमपेज › Satara › अंधश्रध्देतून निष्पाप भाग्यश्रीचा नरबळी?

अंधश्रध्देतून निष्पाप भाग्यश्रीचा नरबळी?

Published On: Feb 10 2019 1:08AM | Last Updated: Feb 09 2019 11:03PM
कराड : अशोक मोहने  

करपेवाडी ता. पाटण येथील भाग्यश्री संतोष माने या 17 वर्षीय महाविद्यालयीन युवतीच्या हत्येप्रकरणी तिच्या जन्मदात्या वडीलांनाच पोलिसांनी अटक केल्याने या हत्त्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. भाग्यश्रीच्या हत्येमागे वडील संतोष माने याचा सहभाग कसा आणि हत्येचे नेमके कारण काय याची चर्चा विभागात सुरू असताना हे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून अंधश्रध्देच्या जोखडात अडकले होते ही बाब समोर आली आहे. त्यामुळे भाग्यश्रीची हत्या ही अंधश्रध्देतून दिला गेलेला नरबळीचा प्रकार आहे का? त्या अनुषंगाने ढेबेवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.   

घटनेची पार्श्‍वभूमी... 

भाग्यश्री तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात इ. 12 मध्ये शिकत होती. अतिशय साधी आणि सरळमार्गी स्वभावाची भाग्यश्री होती. करपेवाडीपासून शंभर दिडशे मीटर अंतरावर हे महाविद्यालय आहे. करपेवाडीतील बहुतांश विद्यार्थी गावातील देसाई शेत पानंद रस्त्याने चालत महाविद्यालयात ये-जा करतात. हा रस्ता शेतातून जातो. रस्त्याच्या दुतर्फा ऊस, गव्हाची पिके आहेत. याच रस्त्यालगत उसाच्या शेतात मंगळवार दि. 22 जानेवारी रोजी भाग्यश्रीचा मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने तिचा गळा चिरण्यात आला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. भाग्यश्रीला कोणी, का व  कशासाठी मारले याचे तर्क -वितर्क लावले जाऊ लागले. 

ढेबेवाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनास्थळी त्यांना कोणतेही हत्यार सापडले नाही.  मात्र घटनास्थळापासून काही अंतरावर असणार्‍या विहिरीजवळ एक कोल्हापूरी चप्पल व चिलीम आढळून आले होते. भाग्यश्रीचे वडील संतोष माने याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला.  उत्तरीय तपासणीत भाग्यश्रीवर कोणतेही शारीरिक अत्याचार झाले नसल्याचे स्पष्ट झाले.  तिच्या शरीरावर कोठेही ओरखडा अथवा जखम झाली नव्हती, पण तिचा गळा मात्र पूर्णपणे चिरण्यात आला होता. 

पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर भाग्यश्री बारावी परीक्षेचे रिसिट आणण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून निघून गेली होती, असे तिच्या आई -वडीलांनी सांगितले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. हत्येच्या अनुषंगाने ज्या- ज्या शक्यता वाटत होत्या त्या सगळ्या पडताळून पाहण्यात आल्या. पण हत्येचे नेमके धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. भाग्यश्रीच्या मैत्रिणी, शाळेचे शिक्षक, नातेवाईक यांच्याकडे चौकशी झाली. 

दरम्यान नाभिक समाज संघटनेकडून संशयित आरोपीला अटक करण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. त्यांनी माने कुटुंबाला रोख स्वरूपात आर्थिक मदतही केली. आंदोलनानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. शुक्रवार दि. 8 रोजी  फेबु्रवारी रोजी  हत्येच्या 18 व्या दिवशी रात्री पोलिसांनी भाग्यश्रीचे वडील संतोष वसंत माने याला ताब्यात घेतले. 

मुलीच्या हत्येप्रकरणी वडीलांना पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली. भाग्यश्रीच्या हत्येत वडीलांचा हात कसा? हत्येचे कारण काय? वडीलांना अटक करण्यासारखे पोलिसांच्या हाती असे कोणते पुरावे सापडले? असे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले. यात एक महत्वाची बाब समोर आली ती अंधश्रध्देची.

भाग्यश्रीच्या हत्येला अंधश्रध्देची किनार ? 

घटनास्थळ व करपेवाडी ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहिती नुसार सेंट्रिगचे काम करणारा संतोष माने परिस्थितीने पूर्ण गंजलेला होता. काही महिन्यांपासून तो व त्याची पत्नी कविता माने कर्मकांड करत होते. 
एका मांत्रिकाकडे ते जात होते. कधी कधी तो मांत्रिकही करपेवाडीत त्यांच्या घरी येत होता. शिवाय दरवर्षी चैत्र महिन्यात  त्यांच्या घरी देवीचा उत्सव व्हायचा. मांत्रिकासह बाहेरगावचे काही बुवा बाबा तेथे यायचे. रात्री उशिरापर्यंत उत्सवाचा कार्यक्रम चालायचा. शेजारील महिलाही हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी करायच्या. 

विजापूरच्या एका मांत्रिकाकडे त्यांचे जाणे- येणे होते.  संतोष मानेच्या घरी भेट दिली तेंव्हा एक मुखवटा असणारे यंत्र त्याच्या घराच्या चौकटीबाहेर अडकविण्यात आल्याचे दिसले. अशा अनेक बाबींवरून भाग्यश्रीचे आई -वडील हे अंधश्रध्देच्या जोखडात अडकले होते हे समोर येत आहे. शिवाय भाग्यश्रीचा मृतदेह ज्या उसाच्या शेतात सापडला त्यापासून काही अंतरावर कोल्हापुरी चप्पल व चिलीम आढळून आली होती. त्यामुळे निष्पाप भाग्यश्रीची हत्या ही अंधश्रध्देतून नरबळीचा प्रकार असावा का अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

ढेबेवाडी पोलिसांनीही हिच शक्यता गृहीत धरून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. याबाबत अजुन नेमकी माहिती समोर आली नसली तरी भाग्यश्रीचे वडील संतोष माने याच्या जबाबातून काही माहिती पोलिसांच्या हाती आली असल्याचे समजते. 

संतोष माने देत असलेली माहिती आणि वस्तुस्थिती यामध्येही पोलिसांना विसंगती आढळून येत आहे. मी कोणाला ओळखत नाही, असा पवित्रा त्याने घेतला आहे.  त्यामुळे पोलिसांनी संतोष माने भोवती तपासाचा फास आवळला आहे. 

आईच्या अंगात येऊन भाग्यश्रीच्या मृतदेहाचा साक्षात्कार झाला म्हणे..

भाग्यश्री दुपारी बारा पर्यंत घरी आली नसल्याने तिच्या आई व आजीने लगेच तिचा शोध सुरू केला. शेजारील लोकांना सांगितले भाग्यश्री बेपत्ता झाली आहे. सर्वजण ती ज्या पानंद रस्त्याने कॉलेजला जाते त्या मार्गावर तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. भाग्यश्रीची आई व आजी भाग्यश्रीचा मृतदेह ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी नेमक्या गेल्या. त्यांनाच सर्वप्रथम मृतदेह दिसला, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांनाच कसा दिसला असे विचारले असता भाग्यश्रीची आई कविता माने यांच्या अंगात आले होते. भाग्यश्री शेतात अमुक ठिकाणी उन्हात झोपली आहे. ती अंगावर काहीतरी मागत आहे, असा साक्षात्कार त्यांना झाला, असे ग्रामस्थांनी सांगितले. 

हत्येच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे. भाग्यश्रीच्या वडीलांच्या जबाबात विसंगती येत आहे. अंधश्रध्देतून ही हत्या झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे. -उत्तम भजनावळे स.पो.नि. ढेबेवाडी पोलिस ठाणे