Thu, May 23, 2019 20:56
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › हॉटेलमधून आयपीएलवर सट्टेबाजी?

हॉटेलमधून आयपीएलवर सट्टेबाजी?

Published On: Apr 28 2018 1:46AM | Last Updated: Apr 27 2018 8:45PMकराड : प्रतिनिधी 

कराड शहर परिसरात पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका नामाकिंत हॉटेलमध्ये आयपीएलवर बुकीकडून सट्टा लावला जात असल्याची जोरदार चर्चा कराडसह परिसरात सुरू आहे. या प्रकारामुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी एक मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र असे असूनही पोलिसांसह प्रशासन या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

ऐतिहासिक व राजकीय द‍ृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या कराड मध्ये राज्यातील अन्य जिल्ह्या प्रमाणेच मटका, जुगार, दारूची अवैध विक्री, खाजगी सावकारी यासह अन्य अवैध धद्यांनी अक्षरश: पोखरून काढले आहे. पोलिसांकडून अधूनमधून कारवाई होते, पण ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे काही दिवसांनी पुन्हा जुगार, मटका, अवैध दारू विक्री यासारखे व्यवसाय कात टाकतात, असा गेल्या काही वर्षापासूनचा अनुभव आहे.  

मात्र दहा वर्षापूर्वी आयपीएलला प्रारंभ झाला आणि यावरही सट्टा लावण्याचे प्रकार सुरू झाले. तीन वर्षापूर्वी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत खेळाडूंसह या सट्टा प्रकरणात गुंतलेल्या काहीजणांना गजाआड केले होते. त्यानंतर खर्‍या अर्थाने सट्टेबाजीचे लोण देशभर पोहचल्याचे समोर आले होते. मात्र हे लोण केवळ कराडमध्ये आले नसून या सट्टेबाजीने कराडसह परिसरात पाळेमुळे घट्ट केल्याची चर्चा सुरू आहे.

नाणेफेक कोण जिंकणार, पहिल्या सहा षटकांत कोणता संघ किती धावा करणार, कोणता संघ विजयी ठरणार? यासह प्रत्येक सत्रावर स्वतंत्र सट्टा लावला जातो, असे बोलले जात आहे. या सट्टेबाजीत हरल्याने कराडमध्ये अनेकांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत उघडपणे कोणीच बोलायला तयार नाही. तसेच या संपूर्ण प्रकारात गुंतलेल्या नागरिकांकडून कमालीची गुप्‍तता पाळण्यात येत आहे. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सट्टेबाजीच्या प्रकाराबाबत कारवाई करण्यात आलेली नाही. आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाल्यावर अथवा नागरिकांनी माहिती दिल्यावर जरूर कारवाई करू, असे संकेतही प्रमोद जाधव यांनी दिली आहे.