Fri, May 29, 2020 19:53होमपेज › Satara › सौर कृषी पंपला मिळेना लाभार्थी : नव प्रकाशचा प्रकाश कागदावरच

महावितरणच्या योजनांचा उडाला बोर्‍या

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 09 2019 12:05AM
सातारा : विशाल गुजर

शेतीसाठी असणार्‍या वीज पुरवठयाचे भारनियमन बंद होण्याची शक्यता नाही. यावर पर्याय म्हणून शासनाने सौर कृषीपंप योजना सुरू केली होती. यामध्ये याचे कर्ज हप्‍ते भरण्याची तयारी शासन व महावितरणने दाखवली होती. परंतु, जिल्ह्यात महावितरणला या योजनेंतर्गत अद्याप 100 सुध्दा लाभार्थी मिळालेले नाहीत. 

अशीच अवस्था नवप्रकाश योजनेची झाली आहे. कायमस्वरुपी वीज तोडलेल्या ग्राहकांची वीज बिल थकबाकी काही अंशी भरल्यानंतर त्यांचे वीज कनेक्शन सुरू करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु, यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याने दोन्ही योजनांचा बोर्‍या वाजला आहे. याबाबत जनजागृती कमी पडल्यानेच योजनांना लाभार्थी मिळत नाहीत. 

महावितरणच्यावतीने ग्राहकांसाठी राबवण्यात येणार्‍या योजना ग्राहकांपर्यंत पोहचत नसल्याने लाभार्थी वंचितच राहत आहे. 

ग्राहकांच्या मिळणार्‍या अल्प प्रतिसादामुळे महावितरणाचे अपयश स्पष्ट होत आहे. शेतकरी असो किंवा सामान्य नागरिकांना योजनांची माहिती न मिळाल्याने सरकारी योजना फक्त कागदोपत्री ठरू लागल्या आहेत. दुर्गम भागातील शेतकर्‍यांना शेती कामासाठी निरंतर वीज उपलब्ध होण्यासाठी अटल सौर कृषीपंप तसेच कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी नवप्रकाश योजना सुरू करण्यात आली आहे. 

योजना यशस्वीतेसाठी मुख्य कार्यालयातून कनिष्ठ कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांद्वारे खेडोपाडी सरपंच व ग्रामस्थांपर्यंत माहिती पोचवली गेली. योजनांचे पोस्टर कार्यालयांच्या दर्शनी भागात लावले गेले. लाभार्थी निवड करून त्यांचे अर्ज मुख्य कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले. परंतु लाभार्थीच आले नसल्याने प्रस्तावही तयार झाले नाहीत. 

दुर्गम भागात राहणारे व वारंवार अर्ज करून देखील वीजकनेक्शन उपलब्ध होत नसलेल्या शेतकर्‍यांसाठी सरकारने खास अटल सौर कृषिपंप योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्याचा समावेश झाला असून सौर कृषीपंप मंजूर झाले. 

परंतु जिल्ह्यातून अद्यापही महावितरण कार्यालयाकडे म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेच्या 100 टक्के खर्चापैकी अगदीच 5 ते 10 टक्के इतका नगण्य हिस्सा लाभार्थी शेतकर्‍यांना उचलावा लागणार आहे. या पंपावर अनुदान तसेच अन्य रकमेसाठी शासन व महावितरण जबाबदारी घेणार आहे. 

पण तरीही शेतकर्‍यांकडून या योजनेस प्रतिसाद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वीज बिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवप्रकाश योजनेला ग्राहकांचा प्रतिसाद नाही. 

या योजनेंतर्गत ग्राहकांना थकबाकी रक्कम पाच टप्प्यात जमा करता येणार आहे. त्यानंतर त्यांचे तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडले जाणार आहे. पण या योजनेसाठीही कोणी पुढाकार घेतलेला नाही. वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडल्यावर काहीजण पर्यायी मार्गाने वीजपुरवठा घेतात. पण अशा बेकायदेशीरपणे घेतलेल्या वीजपुरवठ्यावरही महावितरणकडून कारवाई होत नसल्याने नवप्रकाश सारख्या योजना केवळ कागदावर राहू लागल्या आहेत.