Thu, Apr 25, 2019 17:40होमपेज › Satara › ‘घरकुल’च्या लाभार्थ्यांना जीएसटी नको

‘घरकुल’च्या लाभार्थ्यांना जीएसटी नको

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनिधी   

जीएसटी लागू केल्याने घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या असून जीएसटी माफ करावी, अशी मागणी करणारा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत झाला. 

कोरेगाव पंचायत समितीचे  सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती संजय साळुंखे, सदस्य अण्णासाहेब निकम, डॉ. निवृत्ती होळ, सौ शीला झांजुर्णे, सौ सुप्रिया सावंत, मंगल गंगावणे, साधना बनकर, शुभांगी काकडे, गटविकास अधिकारी श्रीमती साविञी  खर्डे उपस्थित होते. 

राजाभाऊ जगदाळे म्हणाले, घरकूल योजनेचे अनुदान शासनाने वाढवले नाही. या योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती कमकूवत असते. शासनाने जीएसटी लागू केल्याने लाभार्थ्यांपुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना जीएसटी माफ झाला पाहिजे, अशी भूमिका  मांडली आणि तसा ठरावही करुन घेतला. 

संजय साळुंखे म्हणाले, आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात बीएसएमएस वैद्यकीय अधिकार्‍यांच्या 50 जागा भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार हेोत आहे. त्यात सर्व तालुक्यांना समान वाटा मिळावा, असा ठराव मांडला. तो सर्वानुमते  संमत झाला. तसेच जलयुक्त शिवारमध्ये तालुक्याला तसेच वेळू गावाला पुरस्कार मिळाल्याबद्दल परीश्रम घेणार्‍या तालुका कृषी अधिकारी सुनिल साळुंखे व संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेने संमत केला. आर्थिक दुर्बलांसाठी घरगुती वीज कनेक्शन घेण्याची सौभाग्य योजना तालुक्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी गावनिहाय विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याची सूचनाही संबंधितांना करण्यात आली. 

पावसात वाहून गेलेल्या कवडेवाडी येथील पुलाची तात्पुरती दुरुस्ती लवकरच हाती घेण्यात येईल. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी 53 लाखांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवले असल्याची माहिती बांधकाम विभागातर्फे देण्यात आली. 

तालुक्यातील विविध शाळांच्या मदतीसाठी विविध कंपन्यांकडून सीएसआरच्या माध्यमातून निधी मिळवण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभापतींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासही सर्वानुमते मान्यता देण्यात आली. डॉ. निवृत्ती होळ यांनी आभार मानले.