Sat, Jul 20, 2019 02:41होमपेज › Satara › जिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे धरणग्रस्तांचे आंदोलन मागे

जिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे धरणग्रस्तांचे आंदोलन मागे

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:38PMकुडाळ : प्रतिनिधी

आमचा धरणाच्या कामाला विरोध नव्हताच, धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवले जावेत  म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन व उपोषण करावे लागले. धरणग्रस्तांची एकजूट यानिमित्ताने  महत्वाची ठरली असून जिल्हाधिकारी सिंघल यांनी प्रत्यक्ष धरणस्थळी येऊन बहुतांशी मागण्यांविषयी सकारात्मक  भूमिका घेतल्यामुळे महू धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचे  आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

महू हातगेघर धरणस्थळी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काम बंद आंदोलन व साखळी उपोषण स्थळी  जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासह उपजिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले,  अधिक्षक अभियंता घोगरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसिलदार रोहिणी आखाडे तसेच वाई, खंडाळा व  फलटणचे तहसीलदार आदींनी भेट देऊन धरणग्रस्तांच्या मागण्या व प्रश्‍न समजावून घेतले. 

यावेळी वसंतराव मानकुमरे म्हणाले, उपोषण काळात प्रशासनाने धरणग्रस्तांना चांगले सहकार्य करून त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात घेत 90 टक्के  प्रश्‍न निकालात काढले आहेत. उर्वरित मागण्या एक महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

दीपक पवारांनी विनाकारण राजकारण करु नये : मानकुमरे

आमच्या  हक्काची जमीन आम्ही धरणासाठी दिली आहे त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होणे हा आमचा नैैतिक अधिकारच होता. त्यासाठी आम्ही आंदोलन केले म्हणून भाजपच्या नेत्यांना वाईट का वाटावे? ज्याचे जळते त्यालाच कळते  त्यामुळे दिपक पवारांनी विनाकारण राजकारण करू नये.