Thu, Jun 27, 2019 02:33होमपेज › Satara › धोंडा महिन्यामुळे उलाढाल ठप्प

धोंडा महिन्यामुळे उलाढाल ठप्प

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 8:57PMरेठरे बु : दिलीप धर्मे 

हिंदू धर्मात सण, उत्सव, त्याचप्रमाणे रितीरिवाज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.हे नुकत्याच झालेल्या धोंड्या अधिकमासात  दिसून आले. बारा महिन्याचे एक वर्षे मानले जात असते. त्यात भारतीय पंचांग शास्त्रानुसार दर तीन वर्षातून एकादा अधिक महिना मानला जातो. त्यालाच धोंडा अधिकमास म्हणतात. या महिन्यात दानधर्म, देवधर्म, पूजाअर्चा केली जाते. शुभ कार्य, वास्तू कार्य यामहिन्यात  केले जात नाही. या महिन्यात कोणतेही शुभ कार्य, विधी न झाल्याने व्यापारी, दुकानदार तसेच व्यावसायिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. 

भारतात विशेषतः महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मात, शहरा पासून ते अगदी खेडोपाडी ऑक्टोबर ते जून या महिन्यात  विवाह सोहळा  व अन्य शुभ कार्य पार पडले जाते. पंचांग शास्त्रातही  मुहूर्त याच महिन्यात जादा असतात. शिवाय शैक्षणिक सुट्ट्या तसेच गावापासून कोसो दूर  असलेले लोक साधारण या महिन्यात घरी परतत असतात. सर्व बाजूनी ही योग्य वेळ असल्याने शुभ कार्यासाठी सर्वांना सोयीचे ठरत असते. हिंदू रितीरिवाजानुसार शुभ कार्यासाठी वेळ, दिवस, महिना महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी 17 मे ते 15 जून हे महिने या वर्षातील धोंडा अधिक महिना म्हणून पाळण्यात आला होता.

या महिन्यात शुभकार्यासाठी कोणताही मुहूर्त नसल्याने विवाह सोहळा, जावळ, वास्तुशांती, धार्मिक कार्य करण्यात आले नाहीत. बाजारपेठेवर याचा परिणाम झाला. प्रामुख्याने सोने, चांदी, किराणामाल, कपडे आदी अनेक व्यवसायावर याचा परिणाम झाला. त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. उलाढाल ठप्प झाल्याने बँकांचे देणी थकली. भारतात सर्वधर्मातील लोक सण, उत्सव एकत्रित साजरे करत असतात.लग्नसराई, दीपावली, गणेश उत्सवात बाजार पेढेत मोठी उलाढाल होत असते. असे असले तरी तीन वर्षानंतर आलेला धोंड्या अधिमासात मात्र आर्थिक उलाढाल मंदावल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.