Wed, Mar 20, 2019 09:05होमपेज › Satara › मार्च एण्ड नव्हे, छोट्या व्यापार्‍यांचा‘दि एण्ड’

मार्च एण्ड नव्हे, छोट्या व्यापार्‍यांचा‘दि एण्ड’

Published On: Mar 26 2018 1:33AM | Last Updated: Mar 25 2018 11:09PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

आधी मंदी नंतर नोटाबंदी आणि भरीत भर म्हणून पुन्हा जीएसटी व मुळावर उठलेलेे ऑनलाईन मार्केटिंग. यामुळे छोट्या व्यापार्‍यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’अशी झाली आहे. प्रतिवर्षी मार्च अखेरीस काही ना काही उपद्व्याप करून व्यवहार, कर्ज व व्यापाराचा मेळ घालणारे हे छोटे व्यापारी यावर्षी जीएसटीमुळे अडचणीत आले आहेत. छोट्या व्यापार्‍यांसाठी हा मार्च एण्ड व्यवसायाचा ‘दी एण्ड’ करणारा ठरत आहे. 

मुळातच बाजारपेठेत सार्वत्रिक मंदी आहे. त्यात भरीत भर म्हणून ’ अच्छे दिन ’ चे दिवास्वप्न घेऊन आलेल्यांनी तर जी काही ध्येय धोरणे राबवली ती म्हणजे पूर्वीच्या बुरे दिनपेक्षा भयानक ठरली. पूर्वी भलेही सामान्य माणूस अथवा छोटे व्यापारी दैनंदिन श्रीखंड पुरी खात नव्हते मात्र किमान हक्काची भाजी भाकर तरी त्यांच्या ताटातून कोणी हिसकावून घेतली नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सध्याच्या शासनकर्त्यांनी ऑनलाईन व्यापाराला दिलेले प्रोत्साहन शिवाय त्यानंतर नोटाबंदीचा ऐतिहासिक सर्जीकल स्ट्राईक व नंतरच्या जीएस टी करप्रणाली यामुळे मग बुडत्याचा पाय खोलात याप्रमाणे छोटे व्यापारी अक्षरशः देशोधडीला लागले.

सुरूवातीच्या काळात याची काही प्रमाणात झळ बसली मात्र नंतर या बाबी किचकट होत गेल्या. दुकानात असणारा शिल्लक माल व गाठीला असणार्‍या पुंजीवर तात्पुरत्या गरजा भागल्या. पण मुळातच मंदी आणि त्यानंतर नोटाबंदी यामुळे बाजारात रोख पैसाच फिरेना. दरम्यानच्या काळात ऑनलाईन व्यवसायाचे वाढते प्रमाण थेट विक्री व्यवस्था व नानाविध व्यावसायिक आमिषे, योजना तर शासनाकडूनही क्रेडिट, डेबिट कार्ड याचा वापरावर अधिकाधिक भर देण्याची धोरणे यामुळे मग सामान्य ग्राहक, छोटे व्यापारी व ग्रामीण व्यापार व्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली.

तर मोठ्या व्यापार्‍यांनी जीएसटी बाबतीत घातलेल्या निर्बंधामुळे  छोट्या व्यापार्‍यांना किरकोळ माल खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय बाजारपेठांमध्ये ग्राहक नसल्याने मग छोटा व्यापारी मोठ्या होलसेल व्यापार्‍यांची देणी वेळेत भागवूच शकत नाही. आहे त्याच मालावर या स्पर्धात्मक युगात धंदा करणे अवघड तर दुसरीकडे वाढत्या दुकांनामुळे झालेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे नफ्याची कमी झालेली टक्केवारी यामुळे कित्येकदा छोट्या व्यापार्‍यांची उलाढाल म्हणजे केवळ हमालीच ठरत असते. 

एका बाजूला ग्राहक नाही म्हणून शिल्लक माल रोज बदलणार्‍या युगात विकला जात नाही. बदलत्या कर प्रणालीमुळे होलसेल व्यापारी छोट्या व्यापार्‍यांना माल देत नाहीत. नवनवीन व्हरायटी नसल्याने जे काही ग्राहक येतात तेही परत जातात. अशा नानाविध संकटांमुळे अशा व्यापार्‍यांचा पूर्वी दैनंदिन हजारोंचा जमणारा गल्ला आता कित्येक दिवस गिर्‍हाईक नाही म्हणून साधी बवानी सुध्दा होत नाही अशी अवस्था आहे. स्वाभाविकच यामुळे एका बाजुला होलसेल व्यापार्‍यांची देणी थकली परिणामी घेतलेली कर्जे त्यावरील व्याज, चक्रवाढ व्याज आणि मग मुद्दलापेक्षाही व्याजाची रक्कम जास्त होते.

मार्च अखेर असल्याने मग बँका त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांची सातत्याने वाढलेली वर्दळ व बँकेच्या कायदेशीर नोटीसा यामुळे छोटे, सामान्य व्यापारी अक्षरशः या आर्थिक चक्रव्यूहात अधिकाधिकच अडकत गेले आहेत. एका बाजुला ही देणी काही केल्या भागवता येत नाहीत त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचवेळी दुसरीकडे कौटुंबिक खर्च, वाढलेल्या गरजा आ वासून उभ्याच आहेत. किमान गरजा पूर्ण करण्यासाठी मग मिळेल त्या टक्केवारीतून सावकारी पध्दतीने पैसे उचलल्याने काही दिवसात त्याची दामदुप्पट, तिप्पट, चौपट होते आहे. 

आजवर मार्च अखेरीस काही ना काही झोल करून व्यवहार, कर्ज भरून पुन्हा नवे कर्ज घेऊन पुढच्या वर्षाची किमान आशा धरली जायची. मात्र आता तेही नशीबात नाही. त्यामुळे मग दुसरा कोणताच उपाय नसल्याने मग नाईलाजाने शेवटी आहे तोही छोटा व्यापार बंद करण्यापलीकडे संबंधितांच्या हातात काहीच रहात नाही. यापूर्वी ग्रामीण भागात दैनंदिन अथवा आठवडा बाजारातून छोटे व्यापार करणारे यापूर्वीच इतिहास जमा झाले होते. आता या सगळ्या बाबींमुळे छोटे व्यापारीही देशोधडीला लागल्याने त्यांचाही व्यापार बंद पडत चालला आहे. उशाला पैसे नाहीत, भरमसाठ कर्जांचा डोंगर डोक्यावर आणि समोर कौटुंबिक आव्हाने अशी या सामान्य, छोट्या व्यापार्‍यांची अवस्था आहे. उदरनिर्वाहासाठी दुसरे कोणतेही साधन नाही. तर शासन धनदांडग्यांच्या प्रोत्साहन, भल्यामोठ्या उद्योगपतींना पायघड्या, इतरांना कर्जमाफी आदीवर यांच्याच करातील रक्कमांवर वारेमाप पैसा खर्च करत आहे. 

नोटाबंदी व जीएसटीमुळे प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. प्रत्येकाला याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्रास सहन करावा लागला आहे. अनेक लहान व्यापार्‍यांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. परिणामी बेरोजगारी अधिकच वाढली आहे. 

एकूणच या सर्व बाबींचा सर्वच पातळ्यांवर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आजवर शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. काही दिवसांपूर्वी अशाच नोटाबंदी , जीएसटी ला कंटाळून व्यापार्‍याने आत्महत्या केली. निश्चितच ही बाब चिंताजनक आहे. 

 

Tags : satara, satara news, Businessman, GST, trouble,