Thu, Jul 18, 2019 00:11होमपेज › Satara › तुमची कोणीतरी वाट पाहतंय’

तुमची कोणीतरी वाट पाहतंय’

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 9:10PM

बुकमार्क करा

सातारा : संजीव कदम

आठवतेय ती काळरात्र. पोटच्या गोळ्याला सोडून ते सगळेच मुंबईला निघाले अन् अशा एका क्षणात सारेच संपले. ‘तिच्या’ जीवनात उरला तो फक्त अंधकार... आज ना उद्या ती सावरेल पण हक्काचं छत्र आता हरवलंय. काय आणि किती वेदना सहन करायच्या  तिनं. ही एक घटना, अशा किती तरी घटना घडू लागल्या आहेत. केवळ हायवेवरच नव्हे तर राज्यमार्ग अन् जिल्हा मार्गावरही घडणार्‍या या दुर्घटना अनेक संसार उघड्यावर आणत असून जीवाभावाची माणसं एकमेकाला पोरकी होत आहेत. ‘तुमची कोणी तरी घरी वाट पाहतंय’   हे रस्तोरस्ती वाचायला मिळणारे सावधानतेचे फलक नुसतेच बुजगावणे ठरले की काय? असेच भीषण वास्तव आहे.

रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. अति वेग, बेदरकार ड्रायव्हिंग, मद्यप्राशन, रस्त्याची दूरवस्था, अपुरी झोप,  अशा अनेक कारणांमुळे होणार्‍या दुर्घटनांनी लाखमोलाचे जीव हकनाक व स्वस्तात जावू लागलेेत.   एका क्षणात होत्याचं नव्हतं होत आहे. जीवाभावाची माणसं क्षणात काळाच्या आड जात असून त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर कोसळणारं दु:ख सहन करण्यापलिकडचे असते. त्यांच्या वाट्याला येणार्‍या हालअपेष्टा, भोगाव्या लागणार्‍या यातना, परिस्थितीचे चटके, निराधार व असह्य जगणं. यामुळे  परिवार अन् उरलेली माणसं हडबडून जाताहेत. अशावेळी आधार देणारं कोणी नसेल तर त्याचं जीवनच विस्कटूनच जात असतं. एका अपघातामुळे सारंच संपून जातय. काल-परवा घडलेल्या अशाच दुर्घटनांनी हे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले. 

मूळचे काळचौंडीचे असणारे मात्र मुंबईत स्थायिक झालेले आख्खं कुटूंब एका अपघाताने उद्ध्वस्त झालं.  पुण्याजवळ झालेल्या अपघातात डॉ. यशवंत माने, पत्नी शारदा, मुलगा ऋषिकेश व चालक सुर्वे यांचा झालेला दुर्दैवी अंत हृदयाला डागण्या देवून गेला.  डॉक्टर कुटुंबातील एकमेव मुलगी शुभांगी मायणी येथेच थांबल्यामुळे बचावली. मात्र,  तिच्या वाट्याला जे येवून पडलं आहे ते खूप भयंकर आहे. तिला आता सावरायचं आहे. परिस्थितीशी टक्कर देत  उभं रहायचंय.  यासाठी नातलगांचा आधार महत्वाचा ठरणार आहे. चांदवडी (पुर्न), ता. कोरेगाव येथे झालेल्या आणखी  एका अपघाताने  पती-पत्नीला त्यांच्या चिमुरड्या मुलांपासून हिरावून नेले.

दुचाकीवरील शिवाजी शिर्के व त्यांची पत्नी सौ. विद्या शिर्के या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे त्यांची  राजेश (वय 9)  व गौरी (वय 7)  ही चिमुरडी मुले आपल्या आईवडिलांना खेळण्या-बागडण्याच्या वयातच पोरकी झाली असून आई-बाबांना त्यांनी मारलेल्या हाका काळीज चिरून जात आहेत. अशा भयावह वास्तवातून आपण म्हणजेच प्रत्येक वाहन चालकाने काहीतरी बोध घ्यायलाच हवा ना. अपघात टाळण्यासाठी स्वत:पासूनच काळजी घ्यायला हवी ना.

आपल्या घरच्यांसाठी तरी....

अनेक कुटुंबं अन् घरकूलं उद्ध्वस्त करणार्‍या दुर्घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामधून आपण बोध घेणार आहोत की नाही? की बांधकाम विभागाने नुसतेच फलक लावून जागृती करायची? खरोखरच आपली घरी कोणी तरी वाट पाहत असतं. आपल्यावर अवलंबून असणारे जीव अन् त्यांचं भविष्य यासाठी तरी वाहन चालवताना काळजी घ्यायला नको का? नाही तर वेळ गेल्यावर काहीच उपयोग नसतो.  प्रत्येकानेच वाहतुकीचे नियम अन् वेगाची मर्यादा याचे काटेकोर पालन केले तर अनेक दुर्घटना टळू शकतील.