Thu, Sep 20, 2018 15:02



होमपेज › Satara › वर्षा सहलीवेळी हुल्लडबाजी नको

वर्षा सहलीवेळी हुल्लडबाजी नको

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:18PM



सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात धुवांधार पाऊस झाल्याने डोंगर दर्‍यांतील छोटे-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. निसर्गही हिरवागार शालू नेसून या नव्या साजाचे स्वागत करतो. साहजिकच या पावसाळी वातावरणात पर्यटकांना ओढ लागते ती पावसाळी पर्यटनाची. शेकडो फुट उंचीवरून कोसळणारे धबधबे, दोन्ही तिरांनी ओसंडून वाहणार्‍या नद्या, तुडुंब भरलेले जलाशय आदी ठिकाणी तर या वर्षापर्यटकांना साद घालत असतात. पण, अनेकवेळा पर्यटकांचा अतिउत्साह व आत्मविश्‍वास त्यांच्यासाठी जीवघेणा ठरतो. गेल्या काही वर्षातच जिल्ह्यात वर्षा पर्यटन वाढू लागले आहे. मात्र, त्याचबरोबर पर्यटनस्थळांवरील दुर्घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यासाठी वर्षा पर्यटकांनी व प्रशासनानेही काळजी घेणे आवश्यक आहे.

सातार्‍यात पावसाळी पर्यटनासाठी प्रामुख्याने धबधब्यांना पसंती मिळते. यासाठी ठोसेघर हे तर राज्यभरातील पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन आहे. त्याचबरोबर भांबवली, सडा वाघापूर, लिंगमळा, सांडवली, केळवली, एकीव यासह अन्य धबधब्यांबरोबरच ठिकठिकाणच्या घाटरस्त्यावर कोसळणारे छोटे-मोठे धबधबे पर्यटनासाठी नावारुपास येत आहेत. मात्र, यातच काही अतिउत्साही पर्यटकांमुळे पर्यटनस्थळे बदनाम होत आहेत. यापैकी ठोसेघर येथे पर्यटनाचा आनंद लुटताना आतापर्यंत 12 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर कित्येक जण जायबंदी झाले आहेत. धबधब्यांच्या पाणी पात्रात खेळताना पाय घसरून खाली पडणे, धबधब्यावरील दगड निसटून पडणे, सेल्फीच्या नादात दरीत कोसळणे, मद्याच्या नशेत स्टंटबाजी करणे अशा प्रयत्नात या दुर्घटना घडत आहेत.

अशा दुर्घटना घडण्यामागे पर्यटकांचा विशेषतः तरूणांचा अतिआत्मविश्‍वास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येते. 

अनेकवेळा तरूणांचे ग्रुप वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडतात. या पर्यटनाचा आनंद लुटण्याबरोबरच मद्यपानाचा आनंद लुटण्यासाठी ते आतुरलेले असतात. या नशेतच ते स्टंटबाजीचा प्रयत्न करतात. काहीवेळा या नशेत वाहन वेगाने चालवून ते अपघातास कारणीभूत ठरतात. काही महाविद्यालयीन तरूण घरी न सांगता पर्यटनस्थळांवर जातात. तेथे त्यांना रोखणारे कोणी नसते. हे तरूण धोकादायक पर्यटन करून अपघातांना निमंत्रण देतात. अनेक पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त असतो किंवा स्थानिक सुरक्षा रक्षक तैनात असतात. मात्र, त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत हे तरूण धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. नदी किंवा तलावाकाठी पर्यटनास जाणार्‍या काही पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. नदीपात्राची किंवा तलावाची माहिती नसल्याने तसेच पोहता येत नसल्याने अनेकदा पर्यटक पाण्यात बुडून जीव गमावतात. 

अतिधाडस टाळणे गरजेचे...
पावसाळ्यात धबधबे, जंगल, तलाव आदी ठिकाणी टे्रकिंग किंवा पर्यटनाला जाताना पर्यटकांनी नको ते धाडस करणे टाळायला हवे. अशा ठिकाणी पावसामुळे शेवाळ निर्माण होऊन पायवाटा, खडक, दगड निसरडे झालेले असतात. त्यामुळे पाय घसरून दुर्घटना होण्याची शक्यता असते. म्हणूनच वर्षा पर्यटनास जाताना खाद्य पदार्थांबरोबरच सुरक्षा साधनेही सोबत असणे  गरजेचे आहे.

सेल्फीचा मोह आवरा...
आता ज्याच्या त्याच्या हातात अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोन आले आहेत. साहजिकच आपण कुठेही गेलो तरी फोटो काढण्याचा व विशिष्ट गोष्टींसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. मात्र वर्षा पर्यटनस्थळांवर हाच मोह जीवघेणा ठरू शकतो. विशेषतः धोकादायक पार्श्‍वभूमीवर सेल्फी घेणे म्हणजे मृत्यूस आमंत्रण देण्यापेक्षा कमी नाही. यासाठी वर्षा पर्यटकांनी सेल्फीचा मोह आवरणे आवश्यक आहे.