Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Satara › शिवरायांच्या काळात शिरवळमध्ये लढाई

शिवरायांच्या काळात शिरवळमध्ये लढाई

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 7:42PMसातारा : प्रतिनिधी

शिरवळ (ता. खंडाळा) येथील केदारेश्‍वर मंदिरातील शरद शिल्पांचा अभ्यासविजय पाटील या अभ्यासकांनी केला आहे. या अभ्यासामध्ये त्यांना केदारेश्‍वर मंदिरातील शिल्प व बेलसर येथील शिलालेखावरून शिरवळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लढाई झाल्याचे पुरावे सापडले आहे. 

विजय पाटील यांनी याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. केदारेश्‍वर मंदिराच्या वरच्या शिखराच्या भागात एक गुहा आहे. या गुहेत सहज 100 मावळे दाटीवाटीने सरळ उभे राहतील एवढी जागा आहे. मंदिराच्या शिखरावर गेल्यानंतरच ही गुहा दिसते. खालून गेल्यानंतर येथे गुहा दिसत नाही. प्रत्येक शरद शिल्पातील चित्रातील दृश्यात शस्त्र दाखवण्यात आली आहेत. त्याचबरोबर येथे असणार्‍या मूर्तींवर चंद्र व सूर्य दाखवला आहे. याचाच अर्थ ही लढाई रात्रीच्या वेळी अथवा पहाटे झाली आहे असे चित्रीत करत आहे.

ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार 

मंदिरात प्रवेश केला असता देवड्या आहेत आणि त्याच ठिकाणी नगारखाना असावा. तसेच या ठिकाणी पुर्वी एक भुयारी मार्ग होता तो बंद करण्यात आला आहे. असा बराच ऐतिहासिक अभ्यास करून या ठिकाणी लढाईच्या खुणा जाणवत आहे. याचा अधिक अभ्यास करण्यासाठी विजय पाटील यांनी आनंदराव घोलप व संतोष देशमुख यांच्या सहकार्याने माहितीचा शोध घेतला आहे. 

अजूनही बराच शोध करण्यात येत असून त्याचे पुरातत्व विभागाकडून जतन व संवर्धन करण्याच्या कामासाठी याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या अभ्यासावरून शिरवळ व बेलसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली लढाई झाल्याचे पुरावे हाती आले आहेत.

सभामंडपामध्ये आहेत उलटे नाग

शिल्पाच्या चित्रात डाव्या हातातील दिसणार्‍या वाघाचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार कावजी मल्हार यांचे सैन्य पुरंदरकडून शिरवळवर चाल करून आले. येताना शिल्पातील शेपटी फुललेली आहे याचाच अर्थ हरहर महादेव ही गर्जना करत रागाने चाल करण्यासाठी शिरवळकडे येत आहेत याचे प्रतीक आहे. हुबेहुब असेच शिल्प उजव्या हातातील वाघ हाही युध्द पूर्ण करून पुन्हा पुरंदरकडे सैन्य जात असल्याचा इशारा देतो. मागे पहात सिंहावलोकन करत आहे व शेपटीला पुंजका नाही. याचाच अर्थ शांतपणे विजयश्री घेऊन मार्गक्रमण करत असल्याचे प्रतीक आहे. मंदिरातील बाहेरच्या सभामंडपात  28 नाग उलटे आहेत. आतील सभामंडपात 31 नाग उलटे आहेत. पहिल्या सभामंडपात 16 खांब आहेत  मंदिराला तटबंदी आहे. तट बंदीची सरासरी ऊंची  18 फूट आहे. मंदिर पूर्वीमुखी आहे. महाद्वाराचे बांधकाम रेखीव सुबक आहे.