Tue, Jul 07, 2020 23:44होमपेज › Satara › सत्तेसाठी अलुते-बलुतेदारांनी एकत्र यावे

सत्तेसाठी अलुते-बलुतेदारांनी एकत्र यावे

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 10:36PMसातारा : प्रतिनिधी

राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याऐवजी धनगर विरुध्द लिंगायत समाज असा वाद निर्माण केला. काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजपने आतापर्यंत अनु. जाती, जमाती, भटक्या विमुक्‍त जाती व अन्य मागासवर्गीयांचे प्रश्‍न न सोडवता त्यांचा सत्‍ता मिळवण्यासाठीच वापर केला. त्यामुळे या सर्व समाजातील अलुतेदार-बलुतेदारांनी राज्यकर्ते होवून प्रश्‍न सोडवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत  केले. दरम्यान, धनगर समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी दि. 22 रोजी पंढरपूर येथे राज्यव्यापी सत्‍ता संपादन निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही  त्यांनी सांगितले.

डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र शासन अस्तित्वात आल्यापासून ‘धनगर’ व ‘धनगड’ असा वाद निर्माण केला गेला. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने सत्‍ता असताना हा वाद कधीच सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना सोलापूर मेळाव्यात धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण देण्याचे आश्‍वसन दिले होते. मात्र, हे आश्‍वासन त्यांनी पाळले नाही. 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘धनगर’ व ‘धनगड’ हा वाद मिटवून धनगर समाजाला अनु. जमातीचे आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. आता 2019 च्या लोकसभा निवडणुका आल्या असतानाही आरक्षणाच्या हालचाली नाहीत.  हा वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. उलट  राज्यकर्त्यांकडून धनगर आणि लिंगायत समाजात कसा वाद निर्माण होईल हे पाहिले जात आहे. 

डॉ. आंबेडकर म्हणाले, राज्यात धनगरांप्रमाणे 33 जमाती आहेत. राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी मुंबई इलाखा, मध्य भारत, निजाम राज्य व इतर प्रदेश असा भाग होता. या भागातील अनु. जाती व जमातीची सूची 1935 ला करण्यात आली. एससींची यादी तयार केल्यानंतर उरलेल्या जमाती ठरवून त्यांची यादी तयार करण्यात आली. एससी, एसटीमधील जातींची संख्याही कमी करण्यात आली.  त्यानंतर विविध प्रांतांतील भाग जोडून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर संबंधित जातींना पूर्वीचे आरक्षण दिले गेले नाही. तुम्हाला तुमच्या राज्यापुरते सीमीत केल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्यानंतर वेळोवेळी बैठका झाल्या. मात्र, त्यावर कुणीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी अलुतेदार-बलुतेदारांनी मूठ बांधण्याची वेळ आली आहे. आपणच राज्यकर्ते व्हायला पाहिजे. 20 रोजी पंढरपूर येथे धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा होणार आहे. हा मेळावा सर्व अलुतेदार-बलुतेदारांसाठी आहे. या मेळाव्यात विविध समाजाचे 33 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या मेळाव्यातच पुढील दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणावर डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही, भूमिका शरद पवार यांची आहे. मात्र, चंद्रकांत पाटील हेच मोर्चाचे ब्रेन आहे. कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रानेही आरक्षणाचा कोटा वाढवावा का? असे विचारले असता ते म्हणाले, भाजप आणि आरएसएसचा आरक्षणाला विरोध आहे. आरक्षण संपले पाहिजे हाही मुद्दा आहे. आरक्षणाच्या मुद्यावर अस्थिरता निर्माण केली जात आहे. आरक्षणात बदल करण्यास काँग्रेसचाही छुपा पाठिंबा असल्याचे आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाबाबत डॉ. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधानांनीच भिडे यांना अटक होण्यापासून थांबवले आहे. पोलिस तक्रारीत संभाजी भिडे तसेच मिलिंद एकबोटे यांची नावे आहेत. एकबोटे यांना अटक होते, मात्र भिडे यांना अटक होत नसल्याने संबंधित चौकशी अधिकार्‍यावर कारवाई होवू शकते. जाती-जातीमध्ये वाद निर्माण व्हावे असे राजकीय व्यवस्थेला वाटते. दरम्यान, भाजपचे नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारला रामराम ठोकला. पण त्यांना लोकसभेचे तिकिट दिले जाईल की नाही हे माहित नाही. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर केला पाहिजे, असेही डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.यावेळी मल्हार क्रांतीचे मारुती जानकर, तानाजी शिंदे आदि उपस्थित होते.