Mon, Jun 17, 2019 04:48होमपेज › Satara › बाळू खंदारेसह टोळीला मोक्‍का

बाळू खंदारेसह टोळीला मोक्‍का

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 1:21AMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेतील नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याच्यासह त्याच्या 14 साथीदारांवर सावकारीप्रकरणी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलिसांच्या या कारवाईने शहरासह सातारा जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्‍वाला मोठा दणका बसला आहे. रहिमतपूर येथील ट्रक व्यावसायिकाला सावकारीप्रकरणी संशयित खंड्या धाराशिवकरसह संशयितांनी सर्व पैसे घेतल्यानंतरही तक्रारदाराला ट्रक विकण्यास जबरदस्ती करून पुन्हा पैसे घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, बाळू खंदारे सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

बाळू खंदारे, अमोल जाधव, सागर, गणेश (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्यावर मोक्‍काअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रमोद ऊर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर याच्यासह साथीदारांनी सातारा जिल्ह्यात दहशत माजवून टोळीच्या माध्यमातून सावकारीचा अक्षरश: धुडगूस घातला. या टोळीने गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा सावकारीच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मालमत्ता जमवली आहे. ही मालमत्ता जमवताना संशयितांनी दरोडा टाकणे, खंडणी मागणे, गर्दी-मारामारी, अपहरण असे अनेक प्रकार केले आहेत.

सावकारीबाबत मोक्‍का लागलेले हे प्रकरण रहिमतपूर येथील आहे. या प्रकरणात फिर्यादी या महिला असून त्यांच्या मुलाचा ट्रकचा व्यवसाय आहे. 2014 साली या ट्रकवर बेकायदा वाळू वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाने दंड ठोठावला होता. दंडाची रक्‍कम भरण्यासाठी ट्रकचालकाकडे पैसे नव्हते. अशा वेळी खंड्या धाराशिवकर हा व्याजाने पैसे देतो, असे त्यांना समजले. 26 एप्रिल 2014 साली खंड्याकडून ट्रकमालकाने 2 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले. यावेळी खंड्या धाराशिवकर याने कोर्‍या स्टॅम्पवर सह्या घेतल्या. व्याज, मुद्दल, दंड अशी कारणे सांगून खंड्याच्या टोळीने तक्रारदार यांच्या मुलाकडून  2 लाख 80 हजार रुपये वसूल करुन तीन ट्रक जबरदस्तीने चोरुन नेले.

या घटनेनंतर तक्रारदार महिलेने मुलासाठी 2016 मध्ये आणखी एक ट्रक विकत घेतला. हा ट्रक विकत घेतल्यानंतर बाळू खंदारे व त्याचा चालक गणेश यांनी ‘खंड्या धाराशिवकर याचा व तुझा पहिला विषय मिटवून देतो, असे सांगून तो ट्रक कोल्हापूर येथे विकला. ट्रक 1 लाख 80 हजार रुपयांना विकल्यानंतर बाळू खंदारे याने त्यातील 1 लाख 60 हजार रुपये घेतले व 20 हजार रुपये तक्रारदार महिलेचा मुलगा अझीम याला दिले. दरम्यानच्या काळात खंड्या धाराशिवकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर अझीम हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिस ठाण्याच्या परिसरातून बाळू खंदारे, सागर व अमोल जाधव या तिघांनी त्यास दमदाटी करुन तेथून बाहेर नेले. दरम्यान, नुकताच याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या सर्व घटना समोर आल्या.

बाळू खंदारे हा सध्या अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. सुरुची राडा प्रकरणानंतर तो सातार्‍यातून पसार झाला होता. पसार असतानाच सातारा शहर पोलिस ठाण्यात बाळू खंदारे व खंड्या धाराशिवकरच्या टोळीवर सावकारीचा गुन्हा दाखल झाला. सुरुची प्रकरणात बाळू खंदारे पसार असतानाच गेल्या महिन्यात तो सातार्‍यात आल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांना समजल्यानंतर त्याला अटक केली. पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली. त्यानंतर बाळू खंदारे याला गेल्याच आठवड्यात शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सुरुची राडा प्रकरणात अटक केली असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

या सर्व घटनाघडामोडी घडत असतानाच सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि नारायण सारंगकर यांनी बाळू खंदारे याच्याविरुध्द मोक्‍काअंतर्गत प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला. पोलिस मुख्यालयातून हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवल्यानंतर छाननीनंतर अखेर गुरुवारी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. या मोक्क्याच्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक (गृह) राजलक्ष्मी शिवणकर करणार आहेत.

दरम्यान, बाळू खंदारे हा सातारा नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक आहे. सावकारी प्रकरणात यापूर्वी फलटण येथील एका नगरसेवकालाही अटक करण्यात आली आहे. सावकारी पाशाने सातारा शहरासह जिल्हा पोखरलेला आहे. सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांची सावकारीमुळे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये व्हाईट कॉलर मंडळीच संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे.

खंड्यावर मोक्क्याचा दुसरा गुन्हा

खंड्या धाराशिवकरवर यापूर्वी मोक्क्याचा एक गुन्हा दाखल आहे. आता सावकारी प्रकरणात खंड्यावर पुन्हा एकदा मोक्‍का लागला आहे. धाराशिवकर व टोळीने सावकारीच्या माध्यमातून केलेल्या भानगडींचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.