Sun, Aug 25, 2019 04:52होमपेज › Satara › बलशाली युवा संमेलन १२ जानेवारीस

बलशाली युवा संमेलन १२ जानेवारीस

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 06 2018 8:33PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

घारेवाडी (ता. कराड) येथे शिवम् आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानकडून आयोजित केले जाणारे 17 वे ‘बलशाली युवा हद्य संमेलन’ 12 जानेवारीपासून प्रारंभ होत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी यांनी दिली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हे संमेलन तीन दिवस चालणार आहे.

2002 पासून इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बलशाली युवा हद्य संमेलनास सुरूवात झाली होती. या संमेलनाचे उद्घाटन 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता सोलापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांच्या हस्ते होणार आहे. अमरावती ‘प्रयास’, ‘सेवाकुंर’चे संस्थापक डॉ. अविनाश सावजी, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते शिरीष काटकर, त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्ञानेश्‍वर बोडके हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

13 जानेवारीला अशोक खाडे ‘जिद्द जगण्याची’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. याच दिवशी जागो हिंदुस्तानी हा देशभक्तीपर गीतांचाही कार्यक्रम होणार आहे. याशिवाय मुंबईच्या उज्वला धर पाटील, युजर्वेंद्र महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘दीपस्तंभ : मनोबल’ या जळगावच्या प्रकल्पातील दिव्यांग युवक - युवतींचा ‘घेऊया उत्तुंग भरारी’ हा प्रेरणादायी कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे. 

14 जानेवारीला आरवडेचे मठाधिपती अभिरामजी प्रभू यांचे नाम संकीर्तन होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भावेश भाटिया हे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर कोल्हापूर जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या संमेलनास सुमारे तीन ते चार हजार युवक - युवती उपस्थित राहणार आहेत. डॉ. अशोक सावंत, द. जो. पवार गुरूजी, एस. बी. शेट्टी, महेश मोहिते, सावजी काका, संजय पाटील, श्रीकृष्ण सोलंकी यांच्यासह शिवम् प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

23 एप्रिलला बाल संस्कार शिबिर...

शिवम् प्रतिष्ठानकडून गेली 18 वर्ष एप्रिल महिन्यात घारेवाडी येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी हे शिबीर 23 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत होणार असून द. जो. पवार गुरूजी आणि धनंजय कुंभार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.