होमपेज › Satara › बलकवडी धरण 90 टक्के भरले

बलकवडी धरण 90 टक्के भरले

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:41PMवाई : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यासह संपूर्ण वाई तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने 90% भरले असून सांडव्यातून 1435 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धोम धरणात करण्यात येत असल्याचे बलकवडी पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आलेे. 

वाई तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक सुरुवात केल्याने सध्यातरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे. वाईच्या  पश्चिम भागातील भात हे मुख्य पिक असून ते समाधानकारक येणार अशी खात्री या भागातील शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बलकवडी धरण हे 90% भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा बलकवडी धरणातून धोम धरणात विसर्ग होत असल्याने धोम धरणाची पाण्याची पातळी वेगाने वाढताना दिसत आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून 1563 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज मितीला धोम धरण 55% भरले  आहे. धोम-बलकवडी धरणावर जवळपास पाच तालुक्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पावसाने चांगली सुरुवात केल्याने यावर्षी खरीप हंगाम समाधानकारक शेतकर्‍यांच्या पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.