Tue, Mar 19, 2019 03:15होमपेज › Satara › अंगावर गाडी घालून निर्घृण खून

अंगावर गाडी घालून निर्घृण खून

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:20PM

बुकमार्क करा
कराड/काले : प्रतिनिधी

मोटारसायकल खरेदीवेळी फायनान्स कंपनीत भरलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून चिडून जाऊन ऊस तोडणी मजुराचा कारने उडवून खून केला. कालवडे (ता. कराड) येथे गुरुवारी (दि. 4) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी केवळ 16 तासांतच दोघाही संशयितांना ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावला आहे.  

बबन हिंदुराव गाडे (वय 50, रा. कालवडे, ता. कराड) असे खून झालेल्या ऊस तोडणी मजुराचे नाव आहे. तर सुहास शंकर थोरात (वय 40) व शंकर संभाजी थोरात (वय 46, दोघेही रा. कालवडे, ता. कराड) असे खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी सकाळी फिरण्यास जाणार्‍या लोकांना कालवडे ते नांदगाव दरम्यान कालवडे गावच्या हद्दीत रक्कमाबाई खिंडीत रस्त्याच्याकडेला एका व्यक्‍तीचा मृतदेह पडल्याचे दिसले. त्यामुळे लोकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर डीवायएसपी नवनाथ ढवळे व पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता कालवडेतील बबन गाडे यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच मयताच्या अंगावरील जखमा व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर कोणीतरी खून केल्याचे प्रथमदर्शनी त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सुचनेनुसार पो. नि. अशोक क्षीरसागर यांनी तपासाची सुत्रे गतीने हलवल्यानंतर गुरुवारी सायंकाळी बबन गाडे यांना घरातून दोघांनी बोलवून नेल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सुहास थोरात व शंकर थोरात या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता बबन गाडे यांनी मोटरसायकल खरेदी करताना फायनान्स कंपनीकडे भरलेले 5 हजार रुपये परत दिले नाहीत.

वारंवार पैशांची मागणी करूनही बबन गाडे पैसे देत नव्हते. या कारणावरून चिडून जाऊन सुहास थोरात व शंकर थोरात यांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गाडे यांना घरातून बोलावून नेले. त्यानंतर रक्कमाबाई खिंडीत त्यांच्या अंगावर चारचाकी कार घालून त्यांचा खून केला. याची कबूलीही संशयितांनी दिल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले. यावरून संशयितांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

वैयक्‍तिक वादाचे कारण...

गल्या अनेक दिवसांपासून शंकर थोरात, सुहास थोरात व बबन गाडे यांचे पैशांचे व्यवहार होत होते. बबन गाडे यांना फायनान्स कंपनीकडून थोरात यांनी पैसे मिळवून दिले होते. मोटारसायकल खरेदी वेळीही थोरात यांनी गाडे यांना पैशाची मदत केली होती. त्यामुळे वैयक्‍तिक वादातून संशयित दोघांनी गाडे यांचा खून केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांनी दिली.