Wed, Mar 20, 2019 23:27होमपेज › Satara › सातार्‍यात बीएसएनएल सेवेचा खेळखंडोबा

सातार्‍यात बीएसएनएल सेवेचा खेळखंडोबा

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 8:39PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये गुरूवारी सकाळपासूनच बिघाड झाल्याने दिवसभर या सेवेचा खेळखंडोबा झाला. त्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संतापलेल्या ग्राहकांनी अधिकार्‍यांच्या नावाने खडे फोडत कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

सध्या ‘फोरजी’च्या हायस्पीडच्या जमान्याबरोबर  ग्राहकही अ‍ॅडव्हान्स होत चालले आहेत.  बाजारातही विविध कंपन्यांनी ‘फोरजी’च्या  नेट सेवा देवून स्पर्धा निर्माण केली आहे. तसेच बीएसएनएलनेही या स्पर्धेच्या जमान्याबरोबर फास्ट इंटरनेट सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी विविध सवलतीही दिल्या  आहेत. मात्र त्यांच्या सेवेबाबत ग्राहक समाधानी नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. गुरूवारी  तर या सेवेचा चांगलाच बोजवारा उडाला.

सकाळपासूनच बीएसएनएलचे इंटरनेटच धिम्या गतीने चालत  होते. सेवा चालू झाल्यानंतर मध्येच ती बंद पडत होती. त्यामुळे  ग्राहक वैतागून गेले होते. इंटरनेटसेवा वारंवार खंडीत झाल्याने अनेक ग्राहकांची कामे खोळंबली होती. याप्रकरणी अनेकांनी संबंधित अधिकार्‍यांना दूरध्वनीद्वारे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकार्‍यांनीही टोलवाटोलवी केल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाला. बीएसएनएलच्या सेवेचा दररोजच काहीना काही प्रॉब्लेम होत असून अनेक ग्राहक बीएसएनएलपासून आता दूर जावू लागले आहेत. काही ग्राहकांनी तर बीएसएनएलचे सीमकार्डच फेकून देण्याचा पवित्रा घेतला. 

ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेेला  समस्या निर्माण होत असताना आता शहरातही बीएसएनएल सेवेच्या समस्या निर्माण होत असल्याने बीएसएनएलचे मार्केट डाऊन होत असल्याचे वास्तव आहे. खरं तर बीएसएनएल ही शासनमान्य संपर्क सुविधा असल्याने गावोगावी बीएसएनएलचे नेटवर्क जोडले जात आहे. परंतु बीएसएनएल सेवेच्या कनेक्टीव्हीटीबाबत ग्राहकांच्या कायमच तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून बीएसएनएल सोडून इतर मोबाईल कार्डची पसंती दर्शविली जात आहे.