Wed, Jul 17, 2019 16:00होमपेज › Satara › भाजपला यापुढे पाठिंबा नाही : खा. राजू शेट्टी

भाजपला यापुढे पाठिंबा नाही : खा. राजू शेट्टी

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:22PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

गुजरातमध्ये भाजप सरकार पडले तर मलाच काय संपूर्ण देशातील शेतकर्‍यांना खूप मोठा आनंद होईल, असा टोला खा. राजू शेट्टी यांनी लगावला आहे. भाजप व एनडीएशी काडीमोड घेतला असून यापुढे त्यांना पाठिंबा देणार नाही. संपूर्ण भारतातून तब्बल 184 शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन केंद्र सरकारला धडा शिकवणार असल्याचा इशाराही  त्यांनी दिला.

ऊस दर आंदोलनप्रकरणी फलटण येथील न्यायालयात दि. 16 रोजी तारीख होती. त्यासाठी खा. राजू शेट्टी आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेंद्र ढवाण-पाटील, सातारा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, व सचिन खानविलकर उपस्थित होते.

खा. राजू शेट्टी म्हणाले, भाजपने जनतेला फसवले आहे. शेतकरी, तरुण व व्यापार्‍यांना फसवले आहे. या ढोंगी सरकारचा शेतकरीच पराभव करतील. सरकार शेतकर्‍यांसंबंधी ठोस निर्णय घेत नसल्याने अनेक राज्यातील 184 शेतकरी संघटना एकत्र येवून केंद्र सरकारच्या अन्यायाविरोधात एकजूट करणार आहेत. आम्ही शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या 50% जादा नफा हे धोरण ठरवण्यासाठी दोन वेगवेगळ्या समित्या नेमल्या असून एका समितीचा अध्यक्ष मी स्वतः असल्याने यापुढे केंद्रात शेतकरी विरोधी कटकारस्थान होवू देणार नाही.शेतकर्‍यांना कर्जमाफी कायद्याने मिळालीच पाहिजे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांना केंद्र सरकारने मदत केली पाहिजे. 

शेतकरी आपल्या हक्कासाठी पुढे येत असल्याने यापुढे शेतकरी विरोधात भूमिका घेणार्‍या पक्षांना फटका बसणार आहे. फक्त मते मिळवण्यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत, असे म्हणणार्‍या राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात लिहून द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर पुतणा मावशीचे प्रेम करणारे उघडे पडणार आहेत, असे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.

सांगली-कोल्हापूरच्या शेतकर्‍यांसारखी एकजूट करा

राज्य सरकार, कारखानदार व शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जे कारखाने एफआरपी व दर देणार नाहीत त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी. सांगली व कोल्हापूरसारखी एकजूट सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केल्यास उसाचा चांगला दर मिळू शकेल. विखुरलेल्या अवस्थेत न राहता न्याय हक्कासाठी फक्त मतांचे राजकारण करणार्‍या लबाड राजकारण्यांना धडा शिकवा. मते मागायला येणार्‍या नेत्यांना ‘आमच्यासाठी काय करणार ते लिहून  द्या’ असे सांगावे, असे  आवाहन खा. शेट्टी यांनी केले .