Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Satara › मलकापूरसाठी भाजपाचा छुपा अजेंडा!

मलकापूरसाठी भाजपाचा छुपा अजेंडा!

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:23PMकराड : अमोल चव्हाण

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाले. नगरपरिषदेच्या होणार्‍या पहिल्याच निवडणुकीसाठी भाजपाने छुपा अजेंडा राबविण्यास सुरवात केली आहे. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशामुळे मलकापूरमधील वरिष्ठ नेत्यांना व स्थानिक कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले आहे. भाजपाचा करिष्मा अजुनही कायम असून आपणही मलकापूरमध्ये चमत्कार घडवू शकतो असा विश्‍वास त्यांना वाटू लागला आहे. त्यासाठी भाजपा व त्यांच्याशी सलग्न संघटना व विविध घटकांनी कंबर कसली असून मलकापूरमध्ये भाजपाचा सत्ता आणण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता कामाला सुरुवात केली आहे.

मलकापूर नगरपंचायतीचे नगरपरिषद होणार की नाही? याबाबत अनेक तर्क-विर्तक लढविले जात होते. मलकापूरमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेससह विरोधी भाजपा किंवा इतर कोणीही नगरपरिषद नको असे म्हणत नव्हते. तरीही नगरपरिषद होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी लागली. नगरपरिषद होतेय असे वाटू लागल्याने अनेकांनी त्याचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केले. असे असलेतरी मलकापूर नगरपरिषद झाली ही बाब नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. 

मलकापूर नगरपरिषद झाल्याने आता सर्वांनाच नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणूकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीसह मनसे व इतर स्थानिक संघटनांनी आपआपल्या परिने तयारी सुरु केली असलीतरी भाजपाने विशेष मोर्चेबांधणी केल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यासाठी भाजपाशी सलग्न असलेल्या विविध संघटना आपल्या नेहमीच्या शैलीत ग्राऊंड लेवलला उतरून कामाला लागल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यापुर्वी काय करावे लागेल, कोणाला भेटावे, काठावर असणार्‍यांबाबत काय निर्णय घ्यायचा, नाराजांची मोट कशी बांधायची, त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे पोहचायचे, आपल्याकडे कोण येऊ शकतो, चर्चा केलेल्यांना केंव्हा व कोठे समोर आणायचे, पक्ष व संघटनेची भुमिका सांगत असताना सरकारने केलेल्या कामाची बाजू कशा पध्दतीने मांडायची याची पुर्ण तयारी केलेले लोक मलकापूरमध्ये दिसू लागले आहेत. निवडणूकीला सामोरे जात असताना साम, दाम, दंड, भेद यासह सर्वच नितीचा वापर करून यश मिळविण्याचा निर्धार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे मलकापूरमधील भाजपाचे नेते व कार्यकर्त्यांचा विश्‍वास वाढला आहे. सांगलीमध्ये मित्रपक्ष शिवसेना, विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादीसह अनेकजण विरोधात असतानाही आणि मराठा आरक्षणाचे वादळ भाजपा व मुख्यमंत्र्याभोवती घोंगावत असतानाही भाजपाला मिळालेला विजय हा निश्‍चितच कौतुकास्पद आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाला विजय मिळत असल्याने मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीतही असाच चमत्कार करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते व समर्थक कामाला लागले आहेत. सांगलीत मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्‍त करत सांगली झाली आता मलकापूरची बारी, असे भाजपाचे कार्यकर्ते म्हणत आहेत.

सध्या मलकापूरमध्ये काँग्रेसची सत्ता असून येथे सर्वच्यासर्व 19 सदस्य तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे आहेत. मात्र, त्यातील काही सदस्य भाजपाच्या व्यासपीठावर दिसत असून नगरपंचायतीचा कारभार करणार्‍याविरोधात आक्रमक भुमिका घेत आहेत. तसेच भाजपामध्ये नव्याने सहभागी झालेले व सत्ताधार्‍यांचे कायमचे विरोधक असलेल्यांकडून मिळेल त्यावेळी संधी साधून सत्ताधार्‍यांच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. त्यातच भाजपाचे नेते ज्यांना आज भाजपामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. ते मलकापूरसाठी पर्यायाने कराड दक्षिणसाठी वरिष्ठ पातळीवरून सुत्रे हलवत असून त्यांना वजनदार मंत्र्यांचे सहकार्य व साथ मिळत आहे. त्यामुळे त्यांचा सध्या चांगलाच बोलबाला आहे.  

भविष्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणूकीची रंगीत तालिम म्हणूनच भाजपा मलकापूरच्या निवडणूकीकडे पहात आहे. त्यासाठी राजकीय आखाड्यात वापरण्यात येणार्‍या सर्व नितीचा वापर भाजपाकडून केले जाणार आहे. मलकापूर नगरपरिषद ताब्यात आल्यास विधानसभेची निवडणूक लढताना भाजपाला सोपी जाणार आहे. पर्यायाने भाजपा नेत्यांचा विश्‍वास आणखी वाढणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याने सांगली पाठोपाठ भाजपाने सध्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केली आहे.