Tue, Mar 19, 2019 16:09होमपेज › Satara › काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आव्हान

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:01PMकराड : चंद्रजित पाटील 

स्वातंत्र्यापासूनच्या गेल्या 70 वषार्ंत राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा जोपासत केवळ तीनच लोकप्रतिनिधींना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देणार्‍या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच भाजपाचा झंझावात सुरू झाला आहे. कराड नगरपालिकेतील सत्ता, दोन राज्यमंत्रीपदे, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मारलेली जोरदार मुसंडी, राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी सुरू असणारी धडपड आणि काँग्रेसतंर्गत दोन गटातील मतभेद पाहता काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे.

स्वातंत्र्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कराड तालुक्यात 1980 च्या दशकापर्यंत सलग तीस वर्ष सहकारमहर्षी स्व. यशवंतराव मोहिते यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा विधानसभेत फडकवला होता. त्यानंतर 1980 च्या दशकापासून 2014 पर्यंत माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी एकतर्फी वर्चस्व राखत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांना दक्षिणमध्ये ‘तोंडच वर काढून’ दिले नव्हते. मात्र 2014 साली माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसमधून उमेदवारी घेतल्याने उंडाळकर यांनी अपक्ष लढत शड्डू ठोकला होता. त्यामुळे दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला की उंडाळकरांचा बालेकिल्ला? असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

मात्र आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास 16 हजाराहून अधिकचे मताधिक्य देत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचा संदेश मतदारांनी दिला होता. या दरम्यानच डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाशी ‘घरोबा’ केला होता. 2014 साली केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्याचा फायदा घेत भाजपाने प्रथम ना. शेखर चरेगावकर यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देत राज्य सहकार परिषदेची धुरा त्यांच्यावर सोपवली.

त्यानंतर 2016 मध्ये कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद थेट जनतेच्या जनमतावर मिळवत अन्य चार ठिकाणी नगरसेवकांना विजयीही केले आहे. याशिवाय दोन अपक्षांनाही भाजपालाच साथ केली. नगरपालिकेनंतर तीन महिन्यांनी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने कराड तालुक्यातील 12 जिल्हा परिषद सदस्यांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उंडाळकर गटासोबत प्रत्येकी तीन सदस्य निवडून आणत केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही भाजपाने जोर धरल्याचे दाखवून दिले होते. याचवेळी कराड उत्तरमध्ये दोन तर कराड दक्षिणमध्ये चार अशा सहा ठिकाणी भाजपाचे पंचायत समिती सदस्य विजयी झाले. तर तीन ठिकाणी भाजपाला निसटता पराभव स्वीकारावा लागला असला तरी कराड दक्षिणमध्ये सर्वाधिक मते मिळवत भाजपाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

हे कमी होते की, काय म्हणून काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी भाजपाने ना. शेखर चरेगावकर यांना दोन महिन्यांपूर्वी पुन्हा मुदतवाढ देत विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. काँग्रेस अतंर्गत मतभेद आणि त्याचबरोबर डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून गावोगावच्या विकासकामांसाठी भरीव निधी देत काँग्रेसभोवतीचा फास अधिकच आवळण्यास सुरूवातही केली आहे. त्यामुळेच काँग्रेसपुढे भाजपाचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.