होमपेज › Satara › राज्य सरकार डोक्यावर पडले आहे काय? : शशिकांत शिंदे 

राज्य सरकार डोक्यावर पडले आहे काय? : शशिकांत शिंदे 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोडोली : वार्ताहर 

सध्या भाजप सरकारला मेस्मा कोणाला लावावा हे कळत नाही. अंगणवाडी ताईला मेस्मा लावणारे सरकार डोक्यावर पडले आहे काय? या सरकारचे डोकेच ठिकाणावर नाही, अशी घणाघाती टिका आ. शशिकांत शिंदे यांनी केली. 

सातारा पंचायत समितीच्यावतीने पंचायत समितीच्या प्रांगणात शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श लोकनियुक्त सरपंच, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामसेवक, कनिष्ठ सहाय्यक व शिपाई यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पं. स. सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत उपस्थित होते. 

आ. शिंदे पुढे म्हणाले, सध्याच्या सरकारच्या कामकाज पद्धतीवर कर्मचार्‍यांमध्ये खदखद आहे. या सरकारला मेस्मा कोणाला लावावा हे कळत नाही. उद्या कर्मचार्‍यांना मोक्का लावायलाही हे सरकार मागेपुढे पाहणार नाही. सातारा जिल्ह्यात स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची कामकाजाची पोकळी स्व. भाऊसाहेब महाराजांनी भरुन काढली. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आ. शिवेंद्रराजे भोसले यांची वाटचाल सुरु आहे.सत्काराला उत्तर देताना आ. शिवेंद्रराजे  म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्याच्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. आजपर्यंत त्यांच्याच विचारांनुसार कामकाज करणारी सातारा पंचायत समिती आहे. कामकाजामध्ये आडकाठी आणणारे आमचे विचार कधीच नाहीत. नेहमीच कर्मचार्‍यांच्या भावना आम्ही जपत आलो आहोत. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. उपसभापती जितेंद्र सावंत यांनी प्रास्तविक केले. सभापती मिलिंद कदम यांनी आभार मानले. संतोष कणसे यांनी सूत्रसंचलन केले. 

आ. शिवेंद्रराजेंच्या दाढीची व्यासपीठावर चर्चा

व्यासपीठावर आ. शिवेंद्रराजेंच्या दाढीची चांगलीच चर्चा रंगली होती. प्रास्ताविकामध्ये जितेंद्र सावंत यांनी बाबाराजेंनी दाढी ठेवली असून आपल्या कामाचा लुक बदलला असल्याचे सांगितले. हाच धागा पकडत आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवेंद्रराजेंनी दाढीच्या लुकप्रमाणेच कार्यपद्धतीतही बदल केल्याचे आत्ताच्या अधिवेशनात पहायला मिळाले. त्यांची आक्रमकता निश्‍चितच त्यांच्या दाढीला शोभणारी असल्याचे आ. शिंदे म्हणाले. त्यावर आ. शिवेंद्रराजे म्हणाले, माझ्या दाढीबद्दल कोण काय म्हणाले हे मला माहित नाही. मला छत्रपतींचा वारसा लाभला आहे. मला तलवार दिली तर ती फिरवल्याशिवाय राहणार नाही. हात कलम करण्याची ताकद राजघराण्यात असल्याचेही ते म्हणाले.

 

Tags : satara, satara news, shivendraraje bhosale, birthday, Satara Panchayat Samiti, Award distribution,


  •