Wed, Apr 24, 2019 08:18होमपेज › Satara › वीज बिल दुरुस्ती शिबिरास टाळाटाळ

वीज बिल दुरुस्ती शिबिरास टाळाटाळ

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:36PM

बुकमार्क करा

फलटण : यशवंत खलाटे

महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाने 24 नोव्हेंबरला परिपत्रक काढून कृषीपंपाच्या वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी दि. 1 ते 31 डिसेंबर दरम्यान फिडरनिहाय शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. परंतु, जिल्ह्यातील कुठल्याच कार्यालयाने आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. सर्वसामान्य शेतकर्‍यांना शिबिरामुळे आशेचा किरण दिसला होता, परंतु या आदेशालाच केराची टोपली दाखवल्यामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

महावितरणच्या मुबंई येथील मुख्य कार्यालयाने कृषीपंपांच्या वीज बिलांबाबत दि. 24 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढले होते. यामध्ये कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना काही सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कृषीपंपांच्या वीज देयकाबाबत बर्‍याच तक्रारी दाखल झाल्याचे नमूद करून बिलांच्या दुरुस्तीबाबत दि. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरअखेर फिडरनिहाय शिबिराचे आयोजन करावे व प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले होते.

वाढीव बिलांमुळे त्रासलेल्या शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळणार होता. परंतु, सातारा जिल्ह्यात महावितरणने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आधीच चुकीची आलेली मोठ-मोठी बिले थकल्यामुळे अनेकांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. ही बिले दुरुस्त करून मिळाली असती तर ती भरता आली असती. परंतु, शिबिराची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकर्‍यांचा हिरमोड झाला.

शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत महावितरण उदासिन असल्यामुळे शेतकर्‍यांनीच आता जागे होऊन दि. 1 ते 31 या काळात कृषीपंपाच्या वीज बिलाची खात्री करण्याची गरज आहे. वीज कनेक्शन घेताना किती अश्‍वशक्ती (एच.पी) भार होता? आज किती आहे? कधीपासून अश्‍वशक्ती (एच.पी) भार वाढवला? आज रोजी वीज मीटरमध्ये किती रिडिंग व वीज बिलात किती रिडिंग आहे? तफावत असल्यास लेखी अर्ज करून व्याजासह बिल दुरुस्ती करून पैसे परत देण्याची मागणी करण्याची गरज आहे. तसेच तक्रार अर्जाची पोहोच प्रत घेणेही आवश्यक आहे.