होमपेज › Satara › प्रादेशिक योजनेच्या पुनर्जीवनाला थंडा प्रतिसाद

प्रादेशिक योजनेच्या पुनर्जीवनाला थंडा प्रतिसाद

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 09 2018 8:37PMऔंध : वार्ताहर

थकबाकीच्या विळख्यात अडकलेल्या औंधसह  21 गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला सहभागी एकवीस गावांनी थंडा प्रतिसाद दिला. दरम्यान प्रादेशिक पाणी योजनेचे ज्या गावांचे बिल थकीत असेल  त्यांना थकीत पाणीपट्टी भरावीच लागेल, असा इशाराही सीईओंनी दिला. 

औंध येथे प्रभाग समितीची बैठक समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, सभापती संदीप मांडवे,  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. सप्रे, सरपंच सौ. नंदिनी इंगळे,  उपसरपंच सचिन शिंदे, हणमंतराव शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
औंधसह  21 गावांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सध्या बंद आहे.  2012 पासून या योजनेत सहभागी गावांनी पाणी घेतलेले नाही. काही गावे ही योजना पुन्हा सुरू करा, अशी मागणी करतात मात्र  या योजनेचे सव्वा कोटी रुपये बील थकीत आहे.

पाण्याचा वापर केलेल्या ग्रामपंचायतींनी बीले भरलेली नाहीत.  योजनेचे पुनर्जिवन करण्यासाठी थकीत बिल भरुन योजना पुन्हा सुरू करता येईल. या आवाहनाला अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला. काही ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता तरीसुद्धा भरमसाठ बिले आल्याची तक्रार केली परंतु बिले भरावीच लागतील, असा इशारा डॉ. शिंदे यांनी दिला. औंध प्रभागातील शिक्षण, बांधकाम, अंगणवाडी, समाजकल्याण विभाग, घरकुल योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा वापर ग्रामपंचायतीनी आरोग्य व शिक्षण विभागावर प्राधान्याने करावा, अशी सूचना त्यांनी केली.

विविध योजनेतून प्राप्त निधी वेळेत खर्च होतो किंवा नाही तसेच विविध विकासकामांचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, अशी सूचना शिवाजीराव सर्वगोड यांनी मांडली. सुरू असलेली कामे दर्जेदार आणि टिकाऊ स्वरुपाची व्हावीत, यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायतीने  लक्ष द्यावे,  असे आवाहन सभापती संदीप मांडवे यांनी केले. 
विस्तार अधिकारी तमन बोईनवार यांनी प्रास्तविक, ग्रामसेवक चांदशा काझी यांनी सुत्रसंचलन केले.