Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Satara › लूटमार करणार्‍या तिघांना अटक 

लूटमार करणार्‍या तिघांना अटक 

Published On: May 22 2018 10:40PM | Last Updated: May 22 2018 10:34PMऔंध : वार्ताहर

औंध येथील यमाई मंदिर परिसरात प्रेमी युगुलांना लुटणारी तीन युवकांची टोळी 24 तासांत गजाआड करून औंध पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. बाळू गिरिजाप्पा जाधव (वय 34), विशाल अशोक मदने (वय 25, दोघेही रा. महिमानगड, ता. माण) व विशाल कैलास पाटोळे (वय 22, रा. औंध) अशी या टोळीतील संशयितांची नावे आहेत. या टोळीकडून शिखर शिंगणापूर, कोरेगाव, दहीवडी व फलटण परिसरातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता औंध पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याबाबत औंध पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी (दि. 21) औंध येथील यमाई मंदिर परिसरात बनबुवा मंदिराजवळ सायंकाळी चारच्या सुमारास एक प्रेमी युगुल झाडीत बसले होते. त्या ठिकाणी बाळू जाधव व विशाल मदने या दोघांनी प्रेमी युगुलास हटकले. त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल व रोख 2 हजार 500 रुपये काढून घेतले.दरम्यान, या युगुलाने पोलिसांशी संपर्क साधून घडलेली हकीकत सांगितली.पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी त्यांच्याजवळील काही संशयितांचे फोटो दाखवले. त्यातील बाळू जाधव याचा फोटो या युगुलाने ओळखला.त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव    यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅन तयार करण्यात आला. हवालदार प्रशांत पाटील, सुधीर येवले, किरण जाधव, नितीन सजगणे, कुंडलिक कट्रे यांच्या पथकाने महिमानगडला येऊन बाळू जाधव व विशाल मदने या दोघांना ताब्यात घेतले  तर विशाल पाटोळे याला औंध येथून ताब्यात घेतले. यातील बाळू जाधव वर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 यमाई मंदिर परिसरात अशा अनेक घटना घडल्या असण्याची शक्यता आहे. परंतु, भीतीपोटी कोणी तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. जर कोणाला तक्रार द्यायची असेल तर औंध पोलिसांशी संपर्क साधावा, आवाहन औंध पोलिसांनी केले आहे.