Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Satara › मूळपीठ डोंगरावरही रंगीबेरंगी बहर...

मूळपीठ डोंगरावरही रंगीबेरंगी बहर...

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 9:04PMऔंध : वार्ताहर 

 सध्या सर्वत्र उन्हाच्या तडाख्यामुळे जनजीवन,निसर्गातील अनेक घटक होरपळून निघू लागले आहेत. पण, अवघ्या एका आठवडयावर वसंत ऋतूचे आगमन येऊन ठेपले आहे. काही ठिकाणी ऐन उन्हाळ्यात रखरखीत वेलींना आलेली विविध रंगी फुले सर्वांना मोहित करून टाकत आहेत. औंध परिसरातील डोंगर रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहेत.  उन्हाळा म्हटल की सर्वत्र रूक्ष, उजाड वातावरण असेच चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळते. पाणी टंचाई, वाढते तापमान याचा परिणाम प्राणीमात्रांबरोबरच निसर्गातील वनसंपदा व अन्य घटकांवरही दिसून येतो. सध्या तापमानात तर प्रचंड वाढ होऊ लागली आहे. दिवसा पस्तीस ते छत्तीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान जाऊ लागले आहे तर पहाटे अजूनही थंडी पडत आहे. मात्र अशा विचित्र परिस्थितीमध्येही निसर्गातील अनेक वृक्ष वेलींनी आपला बाज बदलला नसून  सध्या ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक झाडांची पानगळ मोठया प्रमाणात सुरु आहे तर अनेक वेली गुलाबी,लाल,पांढर्या, पिवळया, लाल व अन्य रंगांच्या फुलांनी बहरल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळयात औंध परिसरातील मूळपीठ डोंगर  व अन्य भागात हे दृश्य पाहून निसर्गप्रेमी सुखावून जात आहेत.  गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूचे आगमन होत असून मार्च ते जून याकाळात विविधरंगी फुलांचा बहर व निसर्गाचा आविष्कार पहावयास मिळणार आहे.  तरूणाई व निसर्गप्रेमी निसर्गाची ही विविध रूपे आपल्या कॅमेर्‍यात  कैद करण्यास सज्ज झाले .आहेत.