होमपेज › Satara › अंगणवाडी सेविका वाढीव मानधनापासून वंचित

अंगणवाडी सेविका वाढीव मानधनापासून वंचित

Published On: Dec 20 2017 1:45AM | Last Updated: Dec 19 2017 9:22PM

बुकमार्क करा

औंध : वार्ताहर

अंगणवाडी सेविकांनी दोन महिन्यापूर्वी आपल्या मानधन वाढीसाठी राज्यभर आंदोलने केली तसेच मोर्चे काढले पण  त्यानंतरही अंगणवाडी सेविकांची परिस्थिती जैसे थे आहे. अंगणवाडी सेविकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला असून अनेक ठिकाणी मानसिक तणावाखाली व तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने भविष्यात आपले काय होणार, कुटुंंब कसे चालवायचे? याची धास्ती अंगणवाडी सेविकांना लागून राहिली आहे. आपल्या सेवेची हमी आपणास मिळणार का? की फक्त राब राब राबायचेच, अशी मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. 

एकात्मिक बालविकास योजना ही केंद्राची योजना आहे. या योजनेंतर्गत अंगणवाड्यांचे कामकाज चालते.यामध्ये अंगणवाडी सेविकांना  शासन  पाच हजार रूपये मानधन देते तर मदतनीसांना अडीच हजार रूपये मानधन देते. यामध्ये शासनाने प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मानधन देण्यात येईल, असे जाहीर केले होते पण ते देणे तर दुरच पण कोणत्याही प्रकारची वाढही घोषणा करून देण्यात आली नाही. अंगणवाडी सेविकांना विविध प्रकारची कामे करावी लागत असतात. यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक अहवाल तयार करणे, रजिस्टर नोंदणी करणे, गरोदर तसेच स्तनदा माता, शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार देणे, कुपोषित बालकांचा शोध घेणे, त्यांचे कुपोषण दूर करणे अशी अनेक प्रकारची कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात. पण, त्यांच्या 
मानधनवाढीसाठी शासनाने 2002 सालापासूनची माहिती मागविली आहे. त्यासाठीचा खर्च त्यांच्या माथी मारला आहे. मागील 15 वर्षाचा सगळा तपशील, रेकॉर्ड शासनाकडे असूनही हा नाहक त्रास व भुर्दंड कशासाठी? असा प्रश्‍न ही अंगणवाडी सेविकांमधून उपस्थित केला जात आहे.