Wed, Nov 21, 2018 13:17होमपेज › Satara › औंध ग्रामीण रुग्णालयात सुविधांचे तीन तेरा

औंध ग्रामीण रुग्णालयात सुविधांचे तीन तेरा

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:34PMऔंध : वार्ताहर

औंध  ग्रामीण रुग्णालयात सुविधांचे तीन तेरा वाजले असून  अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्यास औंध भागातील सुमारे 25 गावांमधील, वाडया वस्त्यांवरील रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

औंध हे गाव परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती आहे.याठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय हा रुग्णांसाठी जिव्हाळयाचा विषय बनला आहे. अगोदरच हे ग्रामीण रूग्णालय इमारतीच्या दुरवस्थेमुळे समस्येच्या गर्तेत सापडले आहे. याठिकाणी अतिशय तोकडया सुविधा असल्याने एखाद्या गंभीर आजाराने पिडीत रुग्णांना मोठ्या शहरातील रूग्णालयात जावे लागत आहे. गोरगरीब रुग्णांसाठी लाखो रुपये खर्च शासनाकडून केला जातो. परंतु या योजना तळागाळापर्यंत पोहोचतच नसल्याने गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. औंध येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये चांगल्या प्रकारच्या एक्स रे मशिन्स, रक्त, लघवी, हिमोग्लोबीन व अन्य बाबी तपासणीच्या सुसज्ज लॅब, सिटी स्कॅन मशिनरी, ऑपरेशनसाठी आवश्यक सर्व यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

औंध ग्रामीण रुग्णालयासाठी लाखो रुपये खर्च करूनही येथे रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात, त्यामुळे अनेक गंभीर आजारी, अपघातातील जखमी रुग्णांना  यांत्रिक सामुग्री व पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सातारा, पुणे, कराड येथे हलवावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्ण दगावलेही आहेत. तरी हे सर्व थांबण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. औंध ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 कर्मचार्‍यांपैकी 11 कर्मचार्‍यांची पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त असून ती भरली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बडा घर पोकळ वासा...

शासन इमारत   व अन्य सुविधांसाठी लाखो रुपयांचा खर्च एकीकडे करत असून दुसरीकडे कर्मचार्‍यांची 50 टक्के पदे रिक्त रहात असल्याने ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बडा घर, पोकळ वासा अशी झाली आहे. सध्या औंध ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिक्षकांचे एक पद रिक्त आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी वर्ग  2 मधील 3 पदांपैकी 2 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक, लिपीक, औषध निर्माता पदही रिक्त आहे. त्याचबरोबर कक्षसेवक, सफाईगार अशी 3 पदे रिक्त आहेत.