Wed, Mar 20, 2019 09:02होमपेज › Satara › गर्भलिंग निदान करणारे गॅसवर 

गर्भलिंग निदान करणारे गॅसवर 

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:20PMऔंध : वार्ताहर

दै. ‘पुढारी’ने गुरुवारच्या अंकात डॉ. नाथा खाडेच्या कारनाम्याने कळंबी ग्रामस्थ चक्रावले हे वृत्त प्रसिद्ध करून औंध, कळंबी परिसरात खळबळ उडवून दिली असून यामध्ये आणखी कोणते मासे गळाला लागणार याचीच चर्चा दिवसभर सुरू होती. 

अनेक गावांमधील महाभागांनी खाडेकडे जाऊन मुलगा की मुलगी याची तपासणी केली होती, ही माहिती समोर येऊ लागली असून नाथा खाडेवर नेमकी कोणती कारवाई होणार की तो पुन्हा मोकाट सुटणार हे गूढ बनून राहिले आहे. बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याच्याकडे परिसरातील गावांमधील अनेकजण गर्भलिंग तपासणी करण्यासाठी जात होते, ही माहिती पुढे येऊ लागली आहे. पण याचा निश्‍चित आकडा किती हे सध्या गुलदस्त्यात आहे.त्याचबरोबर  परराज्यात तसेच अन्य जिल्हयातून येऊन किती जणांनी तपासण्या केल्या आहेत का हेही तपासणे गरजेचे आहे.  ‘पुढारी’ने नाथा खाडेचा  कारनामा गुरुवारी प्रसिद्ध केल्याने मालदारांचा नाथ बनलेला नाथा एलसीबी समोर कोणाची कुंडली उघड करणार, कोणाची नावे पुढे येणार या भितीने अनेकांची पाचावर धारण बसली आहे.  आपले तर नाव येणार नाही ना या भितीने अनेकजण चिडीचूप आहेत. नाथा खाडेने गर्भलिंग चाचणी मशीन कोठून खरेदी केले. त्यास याकामात कोणी मदत केली आहे तसेच त्याने गोळा केलेली माया कोणाकडे लपवून ठेवली आहे का? याचा शोध लावणे पोलीसांसाठी आव्हानात्मक बनले आहे. एलसीबीने या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

औंध परिसरात पावसाची हजेरी

औंध (वार्ताहर) ः औंधच्या उत्तरेकडील भागातील अनेक गावांमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.मागील पंधरा दिवसांपासून  पावसाची वाट पाहणार्‍या दुष्काळी भागातील बळीराजाला या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. औंध भागातील जायगाव, भोसरे,चौकीचा आंबा, वरूड, सि.कुरोली, नांदोशी ,खबालवाडी व अन्य भागात मागील दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली आहे.